पळपुटे आणि दलबदलू आम्हाला हिंदुत्व शिकवणार काय? खासदार अरविंद सावंत यांनी राणे आणि मिंधे गटाला फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलताना आज लोकसभेत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिंधे गटाच्या खासदारांवर जोरदार हल्ला चढवला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हिंदुत्वाचे बाळकडू दिले. आमचे हिंदुत्व हे मंदिरात घंटा बडवणारे नाही तर अतिरेक्यांविरोधात लढायला लावणारे हिंदुत्व आहे. पळपुटे आणि दलबदलू लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार का, अशा शब्दांत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज लोकसभेत मिंधे गट आणि नारायण राणे यांची चांगलीच फटफजिती केली.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मिंधे गटाच्या तथाकथित हिंदुत्वाचा चांगलाच समाचार घेतला. या वेळी बोलताना सावंत यांनी नारायण राणेंचा उल्लेख अनेक पक्ष फिरून भाजपवासी झालेले असा केल्याने राणेंच्याही वर्मी घाव लागला.

सावंतांना प्रत्युत्तर देताना राणेंची जीभ चांगलीच घसरली. अगदी लोकसभेत धमकी देण्यापर्यंत त्यांनी पातळी गाठली. या वेळी विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी राणेंचे दावे खोडून काढताना जोरदार प्रतिवाद केला. दरम्यान, नारायण राणे यांची धमकी गंभीर असून हे विधान सभा पटलावरून काढण्याची मागणी शिवसेना खासदारांनी केली. त्यानंतर हे विधान वगळण्याचे आश्वासन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी केले.