‘महानंदा’च्या जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा! संजय राऊत यांचा घणाघाती आरोप

महानंदा डेअरीचा विषय अत्यंत संवेदनशिल आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4-5 महिन्यांपासून पगार दिला गेलेला नाही आणि आता महानंदा गुजरात लॉबीला विकली जात आहे. महानंदाच्या 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असून ती जमीन गुजरातच्या घशात घालण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी गुजरात लॉबीशी सौदा केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये केला.

महाराष्ट्राच्या दुग्धविकासमंत्र्यांनी किंवा महसूलमंत्र्यांनी महानंदाचे सध्याचे चेअरमन राजेश परजणे कोण आहेत? ते कोणाचे मेव्हणे, साडू, नातेवाईक आहेत? हे परजणे कोण आहेत आणि त्यांच्या मदतीने 27 एकर जमिनीचा सौदा होतोय की नाही? हे जाहीर करावे असे आव्हानही खासदार संजय राऊत यांनी दिले.

मुंबईतील मोक्याच्या जागा… धारावीपासून ते महानंदापर्यंत, वरळीच्या मिठागारापासून सगळ्या जमिनी फक्त गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत? का जात आहेत? आणि कोण घालतंय? याला स्पष्ट खुलासा ताबडतोब होणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.

महानंदा विकायला काढली त्यामागे महानंदाची 27 एकर जमीन एका लॉबीच्या घशात घालणे हेच सूत्र आहे. शिवसेना या संपूर्ण व्यवहाराकडे लक्ष ठेऊन आहे, असेही राऊत म्हणाले., ते पुढे म्हणाले की, अंगणवाडी सेविकांना 4 महिन्यांपासून पगार नाहीत, महानंदाच्या कर्मचाऱ्यांना 4-5 महिन्यांपासून पगार नाही. सरकारला एवढी भीक लागली आहे का? आमदार-खासदारांना 100 कोटी द्यायला, जाहिरांतीवर खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत, पण सरकारच्या कर्मचाऱ्यांनाच पगार द्यायला नाहीत, कारण सरकारला त्यांच्या जमिनी विकायच्या आहेत. त्यांना रस्त्यावर आणायचे आहे. पण शिवसेना हे होऊ देणार नाही, असेही राऊत यांनी ठणकावले.

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले. आजही त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असून काल आमच्यासमोर जे चित्र आले ते भयानक आहे. गेल्या 4 महिन्यांपासून अंगणवाडी सेवकांना पगार नाहीत. महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविकांना पगार द्यायला सरकारकडे पैसे नसतील तर सरकार का चालवताय? सरकारच्या तिजोरीतला पैसा कुठे जातोय? कोण लुटतोय? हा आमचा प्रश्न असल्याचे म्हणत राऊत यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागे शिवसेना ठाम असून त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ, असेही म्हटले.