मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांना नोटीस

यवतमाळमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज यवतमाळच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या निमित्ताने या नोटीसा धाडण्यात आल्या आहे. महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आपण मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे शिवसैनिकांनी जाहीर केले होते. यामुळेच या शिवसैनिकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमरखेड येथील पोफाळी येथे दौरा असून या पार्श्वभूमीवर महागाव पोलिसांनी शिवसैनिकांना नोटीस दिली आहे. मराठा आरक्षण आणि कंत्राटी नोकर भरती याबाबत आपण जाब विचारणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) प्रमोद भरवाडे यांनी जाहीर केले होते. यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसैनिकांना या नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे.