अपयश स्पष्ट दिसतेय म्हणूनच मोदी-शहांच्या सभांचा राज्यात धडाका; अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तसेच शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारात आघाडी घेतली असून आमचा विजय निश्चित आहे. हिंगोली मतदारसंघात जास्तीत जास्त मतांनी आमचा विजय व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. शिवसेनेची गद्दारी केली, त्यांना गाडून टाकू, या उद्देशाने हिंगोली लोकसभेतील शिवसैनिक कामाला लागले आहेत. यश आमचेच आहे, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना एवढ्या सभा का घ्याव्या लागतात? राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. आता त्यांना डोळ्यासमोर अपयश स्पष्ट दिसतेय. राज्याचे नेतृत्व कुचकामी दिसत आहे. दोन पक्ष फोडून गद्दारांना सोबत घेऊनही यश मिळत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारातही दम नाही. ते सभेत खोटारड्या घोषणा करत,थापेबाजी करत आहेत, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

पंतप्रधानांनी जानकर यांना लहान भाऊ म्हटले आहे. त्यांच्या बहिणीचे जे हाल झालेत तसेच हाल भावाचे होतील, असा टोलाही त्यांनी लगावला. वाघ हा वाघ असतो, जखमी असेल तरी तो वाघच असतो. जखमी झालेला वाघ अतिशय त्वेशाने लढतो. ही लढाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत. आमच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व जातीधर्माची जनता आहे. आमच्यासोबत मुस्लिम समाजही आहे. त्यामुळे काहीजणांना पोटशूळ उठत आहे. आम्ही उद्योगपतींसाठी राजकारण करत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.