त्यांची स्वतःची ओळख काय? अशांनी काँग्रेसवर बोलू नये; नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पलटवार

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमधील या त्यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपकडून आलेला दबाव आणि आदर्श घोटाळा याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. तसेच राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या मेळाव्यात कोणाचेही नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्यासमोर रडले होते आणि दबाव असल्याचे सांगितले होते. तेव्हाही राजकीय चर्चा सुरू होत्या. आता अशोक चव्हाण भाजपसाठी लोकसभेचा प्रचार करत आहेत. त्यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच भाजपने अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले. आता अशोक चव्हाण सभा, बैठका घेत असून भाजपचा प्रचार करत आहेत. अजूनही महाविकास आघाडीच्या जागा अंतिम होत नाहीत. प्रकाश आंबेडकरांना ज्या पद्धतीने वागवले आहे, ते नाराज झाले आहेत. अन्य घटकपक्षही नाराज आहेत. काँग्रेसची फरफट सुरू आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील विद्यमान नेतृत्वामुळे पक्षाचे महत्त्व कमी झाले आहे. काँग्रेसला आता कुणी विचारत नाही, अशी परिस्थिती आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी काँग्रेवर केली होती. त्याला नाना पटोलेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भ्रष्टाचारी नेत्यांसाठी, तसेच सर्वांसाठी आमची दारे उघडी आहे, असे भाजपचे नेते सांगतात. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नावावर मालमत्ता कमावली. सत्ता भोगली. आता दबाव आल्यावर ते भाजपत गेले. अशोक चव्हाण यांची स्वतःची ओळख काय? त्यांच्या मतदारसंघात त्यांना कोण विचारत नाही. त्यांची स्वतःच्याच मतदारसंघात परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे बघावे. काँग्रेसवर बोलू नये, असा पलटवार नाना पटोलेंनी चव्हाण यांच्यावर केला.