Mumbai crime news – बायकोच्या मानलेल्या भावाचा खून करून मृतदेहाचे 4 तुकडे केले, रिक्षाचालकाला अटक

चेंबूर वाशीनाका येथील म्हाडा वसाहत एका क्रूरपणे झालेल्या हत्येच्या घटनेने हादरली. माथेफिरू रिक्षाचालकाने पत्नीच्या मानलेल्या भावाला राहत्या घरी नेऊन निर्दयीपणे कोयत्याचे घाव घालून ठार मारले. इतके करून न थांबता मृतदेहाची सहज विल्हेवाट लावता यावी याकरिता शांत डोक्याने मृतदेहाचे डोके, हात, पाय व धड वेगळे करून ते बॅगेत भरून ठेवले. आरोपीने क्रूरतेची परिसीमा गाठली, पण अखेर त्याला गजाआड जावे लागले.

शफी ऊर्फ शफिक शेख (33) असे क्रूर माथेफिरू आरोपीचे नाव आहे. शफी हा त्याची पत्नी व लहान मुलासह चेंबूरच्या वाशीनाका येथील जे प्लॉट भारतनगरातल्या म्हाडा वसाहतीत इमारत क्रमांक 3 मध्ये राहत होता. शफीच्या पत्नीचा मानलेला भाऊ ईश्वर मारवाडी (17) हा रविवार सकाळी घरातून बाहेर पडला तो परतलाच नव्हता. त्यामुळे ईश्वरची मानलेली आई रेश्मा व वडील ललित पुत्रन हे त्याचा शोध घेत होते.  त्यांनी शफीकडे ईश्वरबाबत विचारणा केली असता मंगळवारी सकाळी तो कुठे आहे ते सांगतो असे म्हणाला. त्यामुळे रश्मी व ललित यांचा शफीवर संशय बळावला.

दरम्यान, बुधवारी पहाटे तो पत्नीला सोबत आईकडे जाण्यास निघाला होता. त्यावेळी रेश्मा व ललित यांनी ईश्वरबाबत विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. आरसीएफ पोलिसांनी शफीची कसून चौकशी केल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. ईश्वरला सोमवारी सकाळी घरी नेऊन आधी मारहाण केली. मग कोयत्याने त्याच्या मानेवर घाव घातला. त्यानंतर स्वयंपाकघरात नेले. तेथे त्याचे मुंडके, दोन्ही हात-पाय वेगळे केले. सगळे तुकडे तीन बॅगांनमध्ये भरून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच म्हाडा वसाहत गाठली आणि बॅगा ताब्यात घेतल्या. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून क्रूरकर्मा शफीला अटक केली.

लहान असतानाच पदरात घेतले

ईश्वर लहान असताना त्याच्या आईचे निधन झाले. मग वडिलांनी दुसरे लग्न केल्यावर ईश्वरला सोडून दिले. त्यावेळी वाशीनाका येथील म्हाडा वसातीत राहणाऱया ललित पुत्रन यांनी त्याला आपल्या पदरात घेतले. ललित व रेश्मा यांच्या चार मुली व दोन मुलांसोबत ईश्वर लहानाचा मोठा झाला. पण शफीच्या डोक्यात संशयाचे भूत संचारले आणि त्यातूनच त्याने ईश्वरची क्रूरपणे हत्या केली.

पत्नी व मेहुणीशी लगट करत असल्याचा संशय

ईश्वर हा शफीच्या पत्नीचा मानलेला भाऊ होता. ईश्वर अल्पवयीन असला तरी पत्नी व मेहुणीशी लगट करतो, त्यांच्यात काहीतरी आहे असा संशय होता. याच संशयातून ईश्वरला कायमचे संपवले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावता यावी याकरिता मृतदेहाचे तुकडे तुकडे केले असे शफीचे म्हणणे असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

हत्येच्या गुह्यात शिक्षा भोगून आला होता

शफीविरोधात हत्या आणि घरपह्डीचा गुन्हा दाखल आहे. मूळचा उरणचा असलेल्या शफीने 2013 मध्ये हत्या केली होती. त्या गुह्यात आठ वर्षांची शिक्षा भोगून तो बाहेर आला होता. त्यानंतर चेंबूर परिसरात तो रिक्षा चालवू लागला. दरम्यान, त्याने रेश्मा व ललित यांच्या मुलीशी लग्न केले आणि म्हाडा वसाहतीत भाडय़ाने घर घेऊन राहू लागला होता.