70,000 रुपयांना “विकत” घेतलेल्या पत्नीची हत्या

नवी दिल्ली पोलिसांनी एका महिलेच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना काही धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव धरमवीर आहे. तो मृत महिलेचा पती असल्याचे कळाले आहे. धक्कादायक गोष्ट अशी आहे की, धरमवीरने मृत महिलेला 70 हजार रुपयांना विकत घेतलं होतं आणि तिच्यासोबत लग्न केलं होतं. या महिलेची हत्या करून आरोपींनी तिचा मृतदेह फतेहपूर बेरी येथील जंगलात फेकून दिला होता. या हत्येप्रकरणी धरमवीरसह पोलिसांनी त्याचे दोन साथीदार अरुण आणि सत्यवान यांनाही अटक केली आहे.

फतेहपूर बेरी खुर्दच्या सीमेवर असलेल्या  झीलजवळच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याबाबत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून हा  मृतदेह ताब्यात घेतला होता असे पोलीस उपायुक्त (दक्षिण) चंदन चौधरी यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले. ते म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना  शनिवारी पहाटे 1.40 च्या सुमारास एका ऑटोरिक्षाचालकाची हालचाल संशयास्पद वाटली होती. नंबरप्लेटवरून अधिक माहिती काढली असता रिक्षाचा चालकाचे नाव अरुण असून तो, छतरपूरचा रहिवासी असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे या खुनाबाबत त्यांनी चौकशीला सुरुवात केली होती.

चौकशीदरम्यान अरुणने मृत महिलेने नाव ’स्विटी’ असल्याचे सांगितले. स्विटी ही धरमवीरची पत्नी असल्याचेही त्याने सांगितले अरुणचा धरमवीर हा मेव्हणा आहे. धरमवीर आणि तिसरा आरोपी सत्यवान हे दोघेही नांगलोईचे रहिवासी होते.या तिघांनी मिळून स्विटीची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता.

अरुणने पोलिसांना सांगितले होते की,त्याला फतेहपूर बेरी येथील जंगलाची माहिती होती. त्यामुळे हत्या केल्यानंतर स्विटीचा मृतदेह इथल्या जंगलात फेकण्यात आला होता. अरुणने सांगितले की , धरमवीर आपल्या पत्नीच्या वर्तनावर खूश नव्हता कारण ती काही कारण न सांगता घरातून पळून जात होती. स्विटीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल कोणालाही माहिती नाहीये,  कारण धरमवीरने तिला 70,000 रुपयांत विकत घेऊन तिच्याशी लग्न केले होते असं अरुणने सांगितलं आहे. स्वीटीने तिच्या पालकांबद्दल किंवा कुटुंबातील सदस्यांबद्दल कधीही काही सांगितले नव्हते, तिने ती बिहारमधील पाटण्याची असल्याचे सांगितले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी महिलेला रेल्वे स्टेशनवर सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेले आणि तिची हत्या केली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या महिलेच्या हत्येप्रकरणी बेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.