सासूच्या टोमण्यांनी हैराण सुनेने केली आत्महत्या

पुण्यामध्ये 22 वर्षांच्या विवाहीत महिलेने आत्महत्या केली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. वर्षभरापूर्वीच या महिलेचं लग्न झालं होतं. सायली भागवत असं या तरुणीचे नाव असून ती पुण्यातील दत्तवाडी भागातील रहिवासी होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी सायलीची सासू राजेश्री यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापूर्वी सायली ही राजेश्री भागवत यांच्या घरी सून म्हणून आली होती. लग्नानंतर काही दिवसांतच राजेश्रीने सायलीला टोमणे मारणे सुरू केले होते. राजेश्री सायलीचा सातत्याने मानसिक छळ करत होत्या, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वाईट-साईट बोलत होत्या असं पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजेश्री यांनी सायली हिला “तू झोपडपट्टीमध्ये राहणारी चिंधी चोर आहेस, तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही” असं म्हणून टोमणे मारले होते. राजेश्री यांनी सायली हिला उपाशी ठेवले आणि नवऱ्यापासून वेगळे केले असाही आरोप करण्यात आला आहे. सायलीला राजेश्री यांनी घरातून पहाटे 2 च्या सुमारास हाकलून दिले होते असाही आरोप असून या छळामुळे सायलीने आत्महत्या केल्याचा संशय आहे.