चुनाभट्टी गोळीबार प्रकरण – आठही आरोपींची निर्दोष सुटका

2016 मध्ये चुनाभट्टी येथील बिल्डर जिनेश जैनवर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आठही आरोपींना सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष ठरवले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निर्णय दिला. मुख्य आरोपी सुमित येरुणकर तसेच इतर सात आरोपींना तातडीने तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले.

5 फेब्रुवारी 2016 रोजी शीव-ट्रॉम्बे मार्गावरील बिल्डर जिनेश जैनच्या कार्यालयात दोघे बुरखाधारी घुसले होते. त्यांनी जिनेश जैनवर गोळय़ा झाडल्या. सुमित येरुणकरने व्यावसायिक वैमनस्यातून हा गोळीबार घडवून आणल्याचा आरोप होता. सत्र न्यायालयात मागील सात वर्षे या घटनेचा खटला चालला. उच्च न्यायालयाने खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा आखून दिली होती. त्यानंतर खटल्याला गती मिळाली. सुनावणीवेळी मुख्य आरोपी सुमित येरुणकरतर्फे ऍड. मिलन देसाई आणि ऍड. हेरंब कदम यांनी, तर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील वैभव बागडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी मुख्य आरोपी सुमित येरुणकरसह अजय करोसी, विनोद विश्वकर्मा, बाबू गुप्ता, सूरज म्हात्रे, उमेश फाळे, राकेशकुमार देवेंद्र, हिमांशू राय या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी सध्या तळोजा आणि मुंबई सेंट्रल येथील तुरुंगात कैद आहेत.