देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान, 9 ते 14 ऑगस्ट रोजी विविध उपक्रम राबविणार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्याबाबत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विशेष सभेत चर्चा करण्यात आली.त्या अनुषंगाने 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

देवगड-जामसंडे नगरपंचायतची विशेष सभा नगरपंचायत कार्यालयात कर निर्धारण अधिकारी उमेश स्वामी यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगरध्यक्ष मिताली सावंत, पाणीपुरवठा समिती सभापती संतोष तारी,आरोग्य शिक्षण सभापती विशाल मांजरेकर व अन्य नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.

विशेष बैठकीच्या निमित्ताने दि.9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान कोणत्याही एका दिवशी 5 विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत कोणत्याही एका दिवशी पाच उपक्रम राबविण्यात यावे अथवा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. यामध्ये ‘वसुधा वंदन’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशी प्रजातीच्या 75 रोपट्यांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. याशिवाय स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दल, नीम संरक्षण दल, पोलीस, शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा यथोचित सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.  ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रमही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविला जाणार आहे. त्याचबरोबर याच कालावधीत शिलालेख अनावरण वृक्षारोपण सन्मान सोहळा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यात यावे असे आवाहन नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी या बैठकीत केले आहे.