संभाजी भिडेंचे डोके ठिकाणावर आहे का; छगन भुजबळ यांची टीका

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. हा वाद शांत होत नाही, तोच भिडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. या वक्तंव्यांबाबत संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करत निषेध व्यक्त केला आहे, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनीही भिडे यांच्यावर टीका केली आहे.

जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. भिडे यांचे आंब्याच्या संदर्भात वक्तव्य होते, त्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत. मोदी किंवा अमित शाह यांच्यापैकी कुणालाही महात्मा गांधींच्या बाबतीतले हे वक्तव्य आवडणारे नाही. भिडेंवर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे, असे भुजबळ म्हणाले. भिडे यांच्याबरोबर जाणे म्हणजे आत्मघातकी आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

पंडित नेहरू यांच्या वडिलांनी देशासाठी सर्व दान केले होते. स्वतः पंडित नेहरू साडे अकरा वर्षे तुरुंगात होते. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही, तर त्याची भलामण करू नका, स्तुती करू नका. आम्ही स्वतः भिडेंच्या विरोधात न्यायालयात गेलो आहोत. ते ज्या प्रकारची वक्तव्ये करत आहेत, त्यामुळे भिडेंचे डोके ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही, असे भुजबळ म्हणाले.