शिक्षकांना वर्गात मोबाईल नेण्यास बंदी; कोल्हापुरात शिक्षणाधिकाऱयांचे आदेश; पालकवर्गातून समाधान

वर्गात शिकवताना मोबाईलवर व्यस्त असलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे. माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना वर्गावर जाताना सोबत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करणारे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबेकर यांनी जिह्यात काढले आहे. सध्या शिक्षण वर्तुळात या पत्राची जोरदार चर्चा सुरू असली, तरी पालकवर्गातून मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोविडपासून सुरू झालेली ऑनलाइन शिक्षणपद्धती अजूनही विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असून, त्यावरही पर्याय काढणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.

कोल्हापूर जिह्यातील अनेक शिक्षक राजकीय तसेच सामाजिक संघटनेत अधिक व्यस्त असल्याने त्यांच्यातील नेतेगिरी वारंवार वाढताना दिसून येत आहे. असे शिक्षक वर्गात कमी आणि बाहेरच जास्त असल्याच्या प्रकारावरून विद्यार्थ्यांना शिकवणार कधी, अशी टीका होत होती. त्यात मोबाईलचाही अतिवापर होत असल्याचेही दिसून येत होते.

शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबेकर यांनी कोल्हापूर जिह्यातील शाळांना भेटी दिल्यानंतर अशा काही बाबी निदर्शनास आल्याने, त्यात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. तरीसुद्धा अपेक्षित सुधारणा न झाल्याने मोबाईल सोबत ठेवल्यास शिकवताना होणारा परिणाम तसेच अन्य घटना टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱयांनी अखेर पत्र काढून अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.  या निर्णयाबद्दल पालक वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

शिक्षकांनी शिकवण्यासाठी वर्गात जात असताना, मोबाईल मुख्याध्यापकांकडे  जमा करायचा आहे. जर विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी मोबाईल आवश्यक असेल तर त्याची नोंद टाचण वहीत करणे गरजेचे आहे. मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय कोणताही शिक्षक मोबाईल वापरणार नाही, असा उल्लेखही शिक्षणाधिकाऱयांनी पत्रामध्ये केल्याचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार यांच्याकडून सांगण्यात आले.

काय म्हटले आहे पत्रात

मुख्याध्यापक व शिक्षकांना वर्गामध्ये मोबाईल नेण्यास व वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शैक्षणिक साहित्य म्हणून शिक्षक मोबाईलचा वापर वर्गात करणार असेल तर त्याची नोंद दैनिक टाचण वहीमध्ये करावी,  तसेच कोणत्या घटकासाठी, संकल्पनेसाठी कोणता व्हिडीओ किती काळ दाखविणार याबाबतचीही सविस्तर नोंद शिक्षकांनी करावयाची आहे. याबाबत मुख्याध्यापकांनी परवानगी दिल्यानंतरच त्या तासापुरताच शिक्षक वर्गात मोबाईल नेऊ शकतील. तो तास संपल्यानंतर पुन्हा मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करणे बंधनकारक राहणार आहे. मुख्याध्यापकांनी शाळा सुरू होताना शाळेच्या कार्यालयामध्ये सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱयांचे मोबाईल जमा करावेत.