राज्यात दुष्काळ; तरीही कृषी आयुक्तांच्या केबिनवर सव्वा कोटींचा पाऊस

पाऊस नाही, चाराटंचाई, दुबार पेरणी, खरीप पिके वाया गेली. राज्यातील शेतकरी दुष्काळी संकटात असताना महायुती सरकारचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण हे मात्र तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च करून आलिशान केबिन आणि कार्यालयातील फर्निचर तयार करून एकप्रकारे शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी मंत्रालयातून कामे थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कृषी आयुक्त चव्हाण यांनी स्वतः च्या दालनाचे नूतनीकरण करताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि महात्मा गांधी यांची प्रतिमा केबिनमधून हद्दपार केली आहे. खरंतर आठ-दहा वर्षांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आलेली कृषी आयुक्तांची केबिन आणि फर्निचर हे सुस्थितीत आणि दर्जेदार होते. असे असताना ते तोडून फोडून काढून नवे करण्याची गरज होती का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. या संदर्भात या केबिनचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या कार्यप्रणालीचादेखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

कृषी आयुक्तालयातील सुस्थितीत असलेली आयुक्तांची केबिन, लहान सभागृह आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सभागृहातील अद्ययावत असलेले फर्निचर तोडून नूतनीकरण व सुशोभीकरणावर तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांची उधळपट्टी सुरू

आलिशान फर्निचरबरोबरच स्क्रीन टीव्ही ध्वनिवर्धक यंत्रणा यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आकस्मिता निधी वापरण्यात आल्याचे सांगण्यात येते.

नवे कृषिभवन, तरीही……

पुण्यातच शिवाजीनगर येथे सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करून नवे भवन उभारले जात आहे. कृषी आयुक्तालय यासह पुण्यातील सर्व कृषी विभागांची कार्यालये या कृषी भवनमध्ये एकत्रित असतील. या कामाला सुरुवातदेखील झाली आहे, असे असताना सेंट्रल बिल्डिंगमधील कृषी आयुक्त कार्यालय आणि त्यांचे केबिन यांच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची खरंच गरज होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.