मुंबईबाहेरून येणाऱ्या बस सीमेवर रोखणार, वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आणि मुंबईबाहेरून येणाऱया प्रवासी बस मुंबईच्या सीमेवरील जकात नाक्यांवर रोखण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांना बेस्ट, मेट्रो आणि रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेरच्या माध्यमातून मुंबईत येण्यासाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबईत येणाऱ्या बसेसमुळे होणारी प्रचंड वाहतूककोंडी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेले जकात नाके 2017 मध्ये बंद करण्यात आल्यानंतर आजपर्यंत दहिसर व मानखुर्द जकात नाके ओस पडले आहेत. त्यामुळे या दोन्ही जकात नाक्यांवर सोयीसुविधांसह थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल, शॉपिंग सेंटर, पार्किंग हब अशा सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या पॅसेंजर गाडय़ा या ठिकाणी हॉल्ट घेऊन पुन्हा परतीला जातील. तर इथून मुंबईत येण्यासाठी कनेक्टिव्हिटी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र बनकण्यात येईल.

राज्य व परराज्यातून दररोज हजारो प्रवासी बस मुंबई शहरात येतात. त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये अजूनच वाढ होते. यावर उपाय म्हणून पालिकेने जकात नाक्यांच्या मोकळय़ा जागेत वाहतूक हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

दहिसर, मानखुर्द नाक्यावर बिझनेस हब
दहिसर जकात नाक्यावर सध्या 18,869 चौरस मीटर जागा आहे. तर मानखुर्द जकात नाक्यावर 29,774 चौरस मीटर जागा आहे. या दोन्ही ठिकाणी मोक्याच्या जागांचा सद्यस्थितीत पालिकेला कोणताही उपयोग होत नाही. यासाठी दहिसर, मानखुर्द जकात नाक्यावर थ्री स्टार हॉटेल, दुचाकी-चारचाकीसाठी पार्किंग हब, सीएनजी सेंटर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, फुड प्लाझा, व्यावसायिक ऑफिससाठी जागा, दुकाने, ट्रान्झिट हॉटेल, कन्व्हेन्शन सेंटर, प्रदर्शन केंद्र अशा सेवासुविधा करण्यात येणार आहेत. यामध्ये दहिसर जकात नाक्याचा कायापालट करण्यासाठी पालिका 992 आणि मानखुर्द जकात नाक्यासाठी 240 कोटी रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. यामुळे पालिकेला महसूलही मिळणार आहे.

दररोज 9 हजार बसेसचा भार
मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड एलबीएस मार्ग, ऐरोली, दहिसर व मानखुर्द चेकनाक्याकरून येणाऱया बसेसचा सर्वे करण्यात आला होता. यात दररोज सुमारे 8 ते 9 हजार पेक्षा जास्त बसेस मुंबईत येत असल्याचे दिसून आले.