Mumbai rain – मुंबईकर ओलीस, पावसाने दिवसभर झोडपले; सूर्यदर्शन नाही

मुंबईत गेले सात दिवस दमदार कोसळत असलेल्या पावसाने मुंबईकरांना ओलीस धरले आहे. कधी जोरदार तर कधी संततधार बरसत आहे. गेले सहा दिवस मुंबईकरांना सूर्यदर्शनही झालेले नाही. त्यामुळे दिवसभर छत्र्या घेऊन फिरणारे मुंबईकर आणि वाहतूककाsंडी असे चित्र सर्वत्र दिसत आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या सहा दिवसांतच जून महिन्याचा 95 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र, तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही.

राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मुंबईत शनिवार, 24 जूनपासून जोरदार सुरुवात केली असून आज आठवडाभर पावसाची संततधार कायम आहे. जूनमध्ये कुलाब्यात सरासरी 542.3 मिमि पावसाची नोंद होते. मात्र, पाऊस लांबला तरी गेल्या सहा दिवसांत कुलाब्यात 371.4 मिमि पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मुंबईत 1 जून ते 29 जूनपर्यंत 502.9 मिमि पावसाची नोंद झाली आहे तर 24 ते 29 जूनपर्यंत 485 मिमि पाऊस पडला.

पडझड सूरूच 

मुंबईत सोसाटय़ाचा वारा आणि पडझड सुरूच असून आज 49 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. पाच ठिकाणी घरे आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या तर पाच ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र, या सर्व घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

असा बरसला पाऊस

मुंबईत आज सातव्या दिवशीही सोसाटय़ाचा वारा आणि संततधार पावसाची बॅटिंग सुरू होती. मुंबई शहरात आज 37.26 मिमी, पूर्व उपनगरात 62.50 मिमी तर पश्चिम उपनगरात 69.42 मिमी पावसाची नोंद झाली. मरोळमध्ये सर्वाधिक 101 मिमी पावसाची तर सर्वात कमी नोंद वरळी, प्रभादेवी, लोअर परळमध्ये 47 मिमी इतकी झाली.

आजपासून 10 टक्के पाणीकपात

या वर्षी मान्सून लांबला असताना तलावांनीही तळ गाठल्यामुळे 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत ही कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा थेट 7 टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे पालिकेला पाणीपुरवठय़ाचे नियोजन करणे अनिवार्य बनले. त्यामुळे जल विभागाकडून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यासाठी 27 जुलै रोजी पालिका आयुक्त प्रशासकांकडे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. तलावांतील पाण्याचा साठा 7 टक्क्यांपर्यंत खाली आल्यामुळे आयुक्तांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे 1 जुलैपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो त्यातदेखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे. दरम्यान, पाणीसाठा कमी असल्यामुळे सद्यस्थितीत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणाच्या राखीव कोटय़ातून दररोज 150 दशलक्ष लिटर पाणी मुंबईसाठी वापरून पूर्ण क्षमतेइतका म्हणजे 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. यात आता 10 टक्क्यांची कपात होणार आहे.