विवाहीत पुरुषाचा दुसऱ्या पत्नीसोबतचा शारिरीक संबंध हा बलात्कारच!

एखाद्या विवाहीत पुरुषाने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पत्नीसोबत जर शारिरीक संबंध ठेवले तर तो बलात्कारच असेल असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे वर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे आरोपीविरोधात दाखल करण्यात आलेला बलात्कार आणि बहुपत्नीत्वाचा गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करावा अशी याचिका आरोपीतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आरोपीविरोधात पीडितेने आरोप करताना म्हटले आहे की, आरोपीने आपला घटस्फोट झाला असल्याचे भासवत आपल्याशी लग्न केले आणि नंतर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने म्हटलंय की तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवली होती. आपलं आपल्या पत्नीसोबत पटत नसून आपण लवकरच वेगळे होणार असल्याचं त्याने या महिलेला सांगितलं होतं. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेताच आरोपीने 18 जून 2014 रोजी या महिलेशी लग्न केलं होतं. 2 वर्ष आरोपी माझ्यासोबत राहिला आणि नंतर त्याने मला सोडून दिलं असं या महिलेचं म्हणणं आहे. अखेर त्रासलेल्या महिलेने आरोपीविरोधात 27 डिसेंबर 2019 रोजी एफआयआर दाखल केला होता.

विवाहीत पुरुषाला दुसऱ्या लग्नाला परवानगी नाही
सुनावणीदरम्यान, आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले होते की, “माझ्या अशिलाने पीडितेशी लग्न केले होते आणि तिच्या संमतीने संबंध ठेवले होते, त्यामुळे बलात्काराचे प्रकरण घडत नाही.” पीडीत महिलेला माहिती होतं की माझ्या अशिलाने 2010 साली पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अर्ज मागे घेतला होता. माझ्या अशिलाने पीडितेला सामाजिक, आर्थिक आणि नैतिक आधार दिला होता. आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादांवर न्यायालयाने म्हटले की, हिंदू कायद्यानुसार पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसऱ्या लग्नाला परवानगी मिळू शकत नाही. जर कोणी असे केले तर तो कायद्याचा भंग असेल. पहिला विवाह अस्तित्वात असताना आपण दुसरे लग्न केल्याचे आरोपीने मान्य केले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन देऊन त्याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले आहे. या बाबी लक्षात घेता आरोपीची याचिका फेटाळून लावण्यात येत आहे.