पाणी जपून वापरा, मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया यंत्रणेमधील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टमचे एअर ब्लॅडर बदलण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईत सोमवार, 20 नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे 2 डिसेंबरपर्यंत ही पाणीकपात सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून एकूण 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा पुरवठा करण्याआधी जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. पाण्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्यानंतरच पालिकेकडून मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेची वेळोवेळी देखभाल-दुरुस्तीही पालिकेला करावी लागते. यानुसार पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात करण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे, भिवंडीवरही परिणाम

मुंबईला होणाऱया 3850 दशलक्ष लिटर पाण्याव्यतिरिक्त 150 दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी पालिकेला देण्यात येते. यामध्ये भातसामधून 100 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी आणि 50 दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे या पाणीपुरवठय़ावरदेखील परिणाम होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे, भिवंडीला होणाऱया पाणीपुरवठय़ामध्येही 10 टक्के कपात लागू करण्यात येणार आहे.