पतीच्या उपचारासाठी कर्ज घेतले, व्याज न दिल्याने महिलेवर बलात्कार

राजस्थानमधील नागौरमध्ये एका महिलेने पतीच्या उपचारासाठी तरुणाकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. या दाम्पत्याने यातील काही रक्कम परत केली होती मात्र तरी आरोपी महिलेवर व्याजासाठी दबाव टाकत होता. एक दिवस त्याने महिलेवर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

राजस्थानच्या नागौरमध्ये एक निंदनीय घटना घडली आहे. अर्धांगवायू झालेल्या पतीच्या उपचारासाठी एका महिलेने पैसे उधार घेतले होते. या महिलेने आरोप केला आहे की व्याज दिले नाही असा बहाणा करून ज्याच्याकडून कर्ज घेतलं होतं त्या व्यक्तीने आपल्यावर बलात्कार केला आहे. बलात्काराचा व्हिडिओ त्याने व्हायरल केल्याचाही महिलेने आरोप केला आहे. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महिलेने पतीच्या उपचारासाठी पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला, मात्र पैशाची व्यवस्था होऊ न शकल्याने दाम्पत्याने नागौर येथील दिल्ली दरवाजाजवळ राहणाऱ्या मेहरदीनशी संपर्क साधला. मेहरदीन व्याजावर पैसे देण्याचे काम करतो.

पीडितेने आरोपीकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते

पीडित महिलेने मेहरदीनकडून 10 हजार रुपये उधार घेतले होते. यातील 5 हजार रुपये तिने परत केले होते आणि ती दरमहा 500 रुपये त्याला देत होते. पीडितेचा पती एके दिवशी बाहेर गेला होता यावेळी मेहरदीन तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करत असतानाचे त्याने व्हिडीओ देखील काढले असे महिलेने म्हटले आहे.

जोधपूरला नेत पुन्हा  बलात्कार केला

या महिलेला मेहरदीनने ब्लॅकमेल करत जोधपूरला नेलं होतं. तिथेही त्याने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळीही त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता आणि तोही व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्याने पीडितेने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र स्थानिकांनी तिला वाचवले होते. पीडितेने मेहरदीनविरोधात पोलिसांत तक्रार केली असून या तक्रारीच्या आधारे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागौर पोलीस ठाण्याचे अधिकारी रामेंद्र सिंह हाडा यांनी सांगितले की, पीडितेने  तक्रार केली होती ज्यात तिने म्हटले होते की, तिने एका तरुणाकडून काही पैसे उधार घेतले होते. पीडितेने पैसे परत केले मात्र मेहरदीन तिला व्याजासाठी त्रास देत होता. मेहरदीनने पीडितेवर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.