कर्नाटकातही 50 खोक्यांची ऑफर, ‘ऑपरेशन लोटस’ची तयारी; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात मिंध्यांना 50 खोक्यांचे आमिष दाखवत भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले. अनेक राज्यात भाजपने खोक्यांचे आमिष दाखवत सरकारे पाडत स्वतःचे सरकार स्थापन केले आहे. आता भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटकातही सुरू झाले आहे. आपल्या राज्यात भाजपने ऑपरेशन लोटस सुरू करण्याच्या प्रयत्नात असून आमदारांना 50 खोक्यांची ऑफर देण्यात येत आहे, असा मोठा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा मोठा दावा केल्याने त्याला महत्त्व आले आहे. भाजप कर्नाटकात ऑपरेशन लोटस सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. महाराष्ट्रात 50 खोके एकदम ओके हे खूप गाजले होते. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. तसेच आता पुन्हा कर्नाटकातही होण्याची शक्यता आहे. पक्ष बदलण्यासाठी भाजप काँग्रेस आमदारांना 50 खोक्यांची ऑफर देत असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये पराभव झाला तर सिद्धरामय्या यांचे राज्य सरकारही कोसळेल, असा दावा भाजपने केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबतचा दावा केला. गेल्या वर्षभरापासून भाजप आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आमच्या आमदारांना 50 खोक्यांची ऑफरही दिली होती. त्यांनी अनेक प्रयत्न केले पण आपण ते यशस्वी होऊ दिले नाहीत, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले.

आमचे आमदार आम्हाला सोडणार नाहीत. आमचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच, असेही त्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा दावा केल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.