राज्यातील सरकार गतिमान; नव्हे गतिमंद!

tanpure

राज्यात दुष्काळाची स्थिती असताना राज्य सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱयांना दिलासा देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. राज्यातील हे सरकार गतिमान नसून, गतिमंद आहे, असा हल्लाबोल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाल्यानंतर आमदार तनपुरे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, योगिता राजळे, सुनीता भांगरे, शहराध्यक्ष अभिषेक कळमकर उपस्थित होते. ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिर्डी येथे राज्यव्यापी मेळावा होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या वेळी सांगितले

आमदार तनपुरे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’साठी जनतेचे कोटय़वधी रुपये उधळले जात आहेत. वास्तविक लोकांच्या घरी जाऊन यांनी दाखले देणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. आज अनेक योजना प्रलंबित आहेत. पाच वर्षे झाली तरी कांद्याचे अनुदान मिळालेले नाही. आज जे अनुदान दिले जाते, ते अनेक शेतकऱयांना मिळतही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या ‘महाविकास आघाडी सरकार’ने शेतकऱयांना कर्जमाफी दिली. या सरकारने 50 हजार रुपये शेतकऱयांना देण्याचे जाहीर करून ते दिलेले नाही. हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करतात. एक रुपयात पीकविमा मिळेल असे सांगतात; पण ई-पीकपाहणी केली नाही, तर पैसे मिळणार कसे असा सवाल करीत या योजनेत 75 टक्के शेतकरी वंचित राहणार असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले. राज्य दुष्काळाच्या उंबरठय़ावर असताना सरकारची उधळपट्टी सुरू आहे. या सरकारने ‘गतिमान सरकार’ अशी केलेली जाहिरात हास्यास्पद असून, हे सरकार गतिमान नसून गतिमंद आहे,’ असा हल्लाबोल तनपुरे यांनी केला.