नेट रनरेटने केलेत अनेकांचे पत्ते कट

आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झालाय आणि काही संघांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा उंचावल्या आहेत. एकीकडे राजस्थान प्ले ऑफ खेळण्याची शक्यता बळावली आहे तर दुसरीकडे बंगळुरूचा खेळ संपल्यातच जमा आहे. पण आयपीएलमध्ये नेट रनरेट कधी जादू करेल काहीही सांगता येत नाही. आयपीएलमध्ये 9 विजय मिळवणारे संघही प्ले ऑफपासून वंचित राहिलेत तर 6 विजय मिळवणाऱया संघानेही प्ले ऑफमध्ये धडक दिलीय. अशक्य असे काहीच नाही. त्यामुळे कोणता संघ अंतिम चौघांत असेल, याचे गणित इतक्या लवकर मांडणे चुकीचे ठरू शकते.

आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे निश्चितच सोप्पे राहिलेले नाही. केवळ विजयच तुमचे स्थान पक्के करते असे नाही. इथे विजयासह तुम्ही नेट रनरेट किती उंचावता यालाही खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. 2019 च्या मोसमात केवळ सहा विजय मिळवूनही हैदराबादने प्ले ऑफमध्ये चौथा संघ म्हणून स्थान मिळवले होते, तर 2013 साली बंगळुरू 9 विजय मिळवूनही साखळीतच बाद झाला होता. याच वर्षी चार संघांनी दहापेक्षा अधिक विजय मिळवले होते. 2012 आणि 2013 च्या मोसमात प्रत्येक संघ साखळीत 16 सामने खेळला होता. हे दोन मोसम वगळता आयपीएलमध्ये प्रत्येक संघ 14 सामनेच खेळत आला आहे.

गेल्या काही मोसमात आठ विजयांची नोंद म्हणजे 16 गुण मिळवणारे संघही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकलेले नाहीत. याचे कारण म्हणजे नेट रनरेट. 2019 साली अव्वल तिन्ही संघ 18 गुणांवर होते तर पुढील तिन्ही संघाचे म्हणजे हैदराबाद, कोलकाता आणि पंजाबचे प्रत्येकी 12 गुण होते झाले होते आणि त्यापैकी नेट रनरेटमध्ये सरस असलेला हैदराबाद प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. 2020 मध्ये पुन्हा एकदा हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता या तिन्ही संघांनी प्रत्येकी 7 विजय मिळवले होते. यात नेट रनरेटने कोलकात्याचा पत्ता कट केला. 2021 मध्ये कोलकाता आणि मुंबईने समान 14 गुण मिळवले होते आणि यात नेट रनरेटने मुंबईला बाहेरचा रस्ता दाखवला होता.

या सर्व घडामोडींमुळे आयपीएलमध्ये नेट रनरेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आणि हा रनरेटच अनेक संघाचे भाग्य घडवतोय. त्यामुळे विजयाने कूस बदलली तर जिंकणारा संघही हरू शकतो आणि हरणारा संघही जिंकू शकतो. तळाला असलेल्या बंगळुरूने पुढील सहाही सामने जिंकले तर आयपीएलची गुणतालिका पूर्णपणे बदलू शकते. एवढेच नव्हे तर जिंकणाऱया राजस्थानवर विजय रागावला तर आताची गुणतालिकाही सरडय़ाप्रमाणे आपला रंग बदलू शकते.