समाजासाठी लढणाऱयांना संपत्तीचा मोह नसतो!

‘समाजासाठी काम करणाऱया व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो. संपत्तीचा मी कधीही विचार केला नाही. समाजसाठी काम करणे हेच माझे उद्दिष्ट आहे,’ असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षांत त्यांच्या कमी झालेल्या संपत्तीबद्दल, तसेच वाढलेल्या कर्जांबाबत स्पष्टीकरण दिले.

आमदार लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाला सादर केलेल्या विवरणात त्यांची संपत्ती कमी होऊन कर्ज वाढल्याची बाब पुढे आली होती. त्याबाबत पत्रकारांनी लंके यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

एकीकडे तुमची संपत्ती कमी होत असताना विरोधी उमेदवार सुजय विखे यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते, असा सवाल करताच लंके म्हणाले, ‘मी जे काही करतोय ते फक्त समाजासाठी. स्वतःसाठी काहीच केले नाही. माझ्यावर आरोप झाले. मात्र, मी अर्ज दाखल केल्यानंतर खरे सत्य बाहेर आले. समाजासाठी काम करणाऱया व्यक्तीला संपत्तीचा कधीही मोह नसतो. संपत्तीसाठी मी कधीही विचार केला नाही. समाजासाठी काम करणे हेच माझे उद्दिष्ट आहे,’ असे नीलेश लंके यांनी सांगितले.

‘गेल्या 50 वर्षांपासून आम्ही राजकारणात आहोत. आमच्या संस्था आहेत, आम्ही सहकारामध्ये काम करतो. त्यामुळे माझी श्रीमंती हा निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही,’ असे सुजय विखे सांगतात, असे विचारताच लंके म्हणाले, त्यांची श्रीमंती सर्वांनाच माहीत आहे. मात्र, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. सत्तेचा गैरवापर करणे, कार्यकर्त्यांवर दबाव आणणे असे प्रकार विखे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही नीलेश लंके यांनी केला.