मेगाब्लॉकमुळे हुकला लग्नाचा मुहूर्त! मध्य रेल्वेवर प्रवाशांची रखडपट्टी; सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी

मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची जागोजागी रखडपट्टी झाली. ऐन लगीनसराईत रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले. त्यामुळे अनेकांना लग्नाचा मुहूर्त गाठणे शक्य झाले नाही. सायंकाळपर्यंत मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचे चित्र पाहायला मिळाले.

नोकरदारांची गैरसोय नको म्हणून रेल्वे प्रशासन मेगाब्लॉकसाठी रविवार हा कार्यालयीन सुट्टीचा दिवस निवडते आणि देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेते. एरवी सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱयांचे हाल होतात, मात्र या रविवारी लग्नाचा मुहूर्त होता. अनेक ठिकाणी लग्न समारंभाची धामधूम होती. त्यातच मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आणि नातेवाईकांचा लग्न मुहूर्तावर हॉलवर पोचण्याचा बेत फिस्कटला. लोकल वेळेवर धावत नव्हत्या. त्यामुळे दादर, ठाणे, कुर्ला, घाटकोपर या प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकाला पंटाळून रस्ते प्रवासाला पसंती दिली. मुंबईकर-ठाणेकरांसह गावी जाणाऱयांचेही खूप हाल झाले. उन्हाच्या तडाख्यात मेगाब्लॉकचा मनस्ताप सहन करावा लागल्याने प्रवाशांची चिडचिड झाली.

उद्घोषणांचीही बोंब 

रेल्वे प्रशासनाने अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या, मात्र गाडय़ांच्या मार्गात अचानक बदल करताना योग्य उद्घोषणा केल्या जात नव्हत्या. त्यामुळे आयत्या वेळी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱया प्लॅटफॉर्मवर जाताना महिला व ज्येष्ठ नागरिकांची खूप दमछाक झाली.

हार्बर प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम

हार्बर रेल्वेवर सीएसएमटी-वडाळा रोडवरून वाशी, बेलापूर, पनवेलपर्यंतची लोकल सेवा सायंकाळी पावणेपाच वाजेपर्यंत पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मध्य रेल्वेची मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून वळसा घालून इच्छित ठिकाण गाठावे लागले.

मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेतला होता, मात्र या दरम्यान प्रवाशांच्या होणाऱया गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना आखल्या नव्हत्या. त्यामुळे मुंबईतले दुसऱया क्रमाकांचे गर्दी असलेल्या कुर्ला स्थानकात प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी झाली होती. मेगाब्लॉक घेताना गर्दीसाठी नियोजन करावे. त्यामुळे गैरप्रकार होणार नाहीत, अशी मागणी प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणावर केली जात आहे.