भ्रष्टाचाराचे डाग गायब… बोला, आता या आरोपांचे काय होणार?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून रान उठवले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. तेच नेते भाजपसोबत गेल्याने व मंत्री बनल्याने ‘बोला, आता या आरोपांचे काय,’ असा प्रश्न जनता विचारत आहे.

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कंपन्या तयार करून 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या तक्रारीनंतरच मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानावर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते. मुश्रीफांवर अटकेचीही टांगती तलवार आहे. ती टाळण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे.

अजित पवार यांच्यावर 72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाचा आरोप भाजपने सातत्याने केला. राज्य सहकारी बँक घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणावरूनही अजित पवार व त्यांच्या निकटवर्तीयांना सोमय्या व भाजपच्या नेत्यांनी घेरले होते.

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदनाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया तसेच किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून ईडीने गुन्हा दाखल करून भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये अटक केली होती. दोन वर्षे ते जेलमध्ये होते.

प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर वरळी येथील वादग्रस्त मालमत्तेच्या व्यवहारप्रकरणी आरोप झाले. या मालमत्तेवर ईडीने टाचही आणली. गँगस्टर इक्बाल मिर्चीकडून ही जागा घेऊन मोठा मोबदला दिल्याचे हे प्रकरण आहे.

सिंचन घोटाळा तसेच रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळाप्रकरणी सुनील तटकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. भाजपकडून आरोपही झाले. त्याच तटकरे यांची कन्या आदिती तटकरे आज मंत्री झाली.