शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष – अजित पवार

आम्हीच मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांना मुक्त केल्याची घोषणा केली. त्याचबरोबर नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी विचारला असता, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबच आहेत हे तुम्ही विसरलात का? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी माध्यमांना केला.

सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांना मुक्त केले असून सुनील तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली. या नियुक्त्या कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या स्वाक्षरीने करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 या नियुक्त्यांचे समर्थन करताना प्रफुल पटेल म्हणाले की, पक्षाच्या 21 जूनच्या कार्यक्रमात पक्षाने मला अधिकृतरीत्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. त्याआधी सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले होते, त्यानंतर पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली होती. तेव्हा माझ्या स्वाक्षरीने राज्यात जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून ही नियुक्ती केली होती. आताच्या पार्श्वभूमीवर मी जयंत पाटील यांना जबाबदारीतून मुक्त करत असल्याचे अधिकृतरित्या कळवले आहे. असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

पक्ष कोणाकडे आयोग ठरवणार

पक्ष कुणाकडे आहे चिन्ह कुणाकडे आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आम्हीच पक्ष आहोत, बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. कुणाला हे बंड वाटते, पण तुम्हाला वाटून काही चालत नाही, त्याला कायदा, नियम आहेत. उद्या वाद निर्माण झाला तर आयोगाने दिलेला निर्णय अंतिम असतो, हे तुम्ही अलिकडेच पाहिले असल्याचे अजित पवार आणि प्रफुल पटेल म्हणाले.

अजित पवारांची निवड

विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून जयंत पाटील यांच्या जागी अजित पवार यांची नियुक्ती केल्याची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली. आमदारांनी अजित पवारांना पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून नियुक्त केले आहे. अजित पवार पक्षाच्या वतीने विधिमंडळ नेत्याची जबाबदारी सांभाळतील. तसेच अनिल पाटील हे आमचे प्रतोद होते, त्यांना त्या पदावर कायम ठेवावे असे विधानसभा अध्यक्षांना कळवल्याचेही पटेल यांनी यावेळी सांगितले.

आमचे बेरजेचे राजकारण

सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला असता, आम्ही हकालपट्टी करण्याकरता बसलो आहे का?आम्ही बेरजेचे राजकारण करतो, आहे इथे हकालपट्टी करायला बसलो नाही, असे अजित पवार म्हणाले.

5 तारखेलाच  बैठक

शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची 5 जुलै रोजी बैठक बोलवली असून अजित पवार यांनीही 5 जुलै रोजीच वांद्रे येथील एमईटी संस्थेत पदाधिकाऩयांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी यांना बोलवण्यात आले असून राज्यभरातून राष्ट्रवादीतील पदाधिकारी उपस्थित राहतील असे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.

इतर नियुक्त्या

यावेळी प्रदेश महिला अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांच्या जागी रुपाली चाकणकर, युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण, प्रवत्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे, सुरज चव्हाण यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

आमदारांची संख्या सांगण्यास नकार

आमच्यावर कारवाई करण्याचा शरद पवारांनी घेतलेला निर्णय लागू होत नाही. आमच्या पक्षाच्या बहुसंख्य लोकांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे, लोकशाहीत बहुमताने घेतलेला निर्णय वैध आहे, तो कोणी बदलू शकत नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. कुठलाही वाद होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडे आमदार आहेत म्हणून शपथ झाली. तेव्हा पत्रकारांनी तुमच्यासोबत किती आमदार आहेत असा प्रश्न केला. त्यावर, आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही, जे पक्षावर दावा करत आहेत, त्यांनी  त्यांच्याकडे किती आमदार आहेत हे सांगावे असे उत्तर देत अजित पवारांसोबत नक्की किती आमदार आहेत याचे उत्तर दिले नाही.

अमोल कोल्हे परतले

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे शपथविधीवेळी अजित पवार यांच्यासोबत राजभवनात हजर होते; मात्र आज ते शरद पवार यांच्याकडे परतले. ‘मी साहेबांसोबत’ असा हॅशटॅग करून कोल्हे यांनी ट्विट केले आहे. जेव्हा मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष होतो तेव्हा मनाचे ऐका; कारण कधीकधी बुद्धी नैतिकता विसरते, असे ट्विट कोल्हे यांनी केले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज बंडखोरांसोबत गेलेल्या ठाणे येथील आनंद परांजपे आणि मुंबईचे नरेंद्र राणे या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

  • आम्हीच पक्ष आहोत, कुणाला हे बंड वाटते, पण तुम्हाला वाटून काही चालत नाही, त्याला कायदा, नियम आहेत.
  • आम्ही हकालपट्टी करण्याकरता बसलो आहोत का? आम्ही बेरजेचे राजकारण करतो, आम्ही इथे हकालपट्टी करायला बसलेलो नाही.
  • राज्यात जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून तात्पुरती नियुक्ती केली होती. आता मात्र त्यांना त्या पदावरून मुक्त करत आहोत.
  • 5 जुलै रोजी वांद्रे येथील एमईटीत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. बैठकीला राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित राहतील.