Video – पंतप्रधान मोदी झाले भावुक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रे-नगर येथे असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 15 हजार घरांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आपल्या लहानपणी मलाही असे घर मिळाले असते तर…’, असे सांगत पंतप्रधान मोदी भरसभेत भावुक झाले. दरम्यान, रामाच्या आशीर्वादानेच देशात सुशासन आणण्याचा प्रयत्न आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या संकल्पनेतून असंघटित कामगारांसाठी सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारी येथे साकारलेल्या देशातील सर्वांत मोठय़ा रे-नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पहिल्या टप्प्यातील 15 हजार सदनिकांचे वितरण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम आदी यावेळी उपस्थित होते.

पंढरपूरचा श्री विठ्ठल आणि सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांना नमस्कार करतो, अशी मराठी भाषेत भाषणाची सुरुवात करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज महाराष्ट्रात अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. 2019 साली सोलापुरातील असंघटित कामगारांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते आणि आज ते पूर्ण होत आहेत. लाखो कामगारांचे आशीर्वाद हेच माझे धन आहे, असे सांगत, ‘लहानपणी मला असे घर मिळाले असते तर आनंद झाला असता’, असे सांगत पंतप्रधान मोदी भावुक झाले.

‘22 जानेवारी हा ऐतिहासिक क्षण आहे. आपण त्यादिवशी घराघरात रामज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.