पुण्याचा आयटी अभियंता पाकिस्तानच्या संपर्कात; ओडिशा पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

 

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथका (एसटीएफ)ने पुण्यातील संगणक अभियंता अभिजीत जांबुरे या तरुणाला अटक केली आहे. जांबुरे हा मूळचा सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील आहे. तो माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करीत होता.

 जांबुरेने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय तांत्रिक माहिती, ओटीपी पुरविल्याचा आरोप आहे. ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने जांबुरेला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून ओडिशा पोलिसांचे पथक भुवनेश्वरला रवाना झाले. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील दोन अधिकाऱयांच्या संपर्कात होता. जांबुरेने तयार केलेल्या ओटीपींची विक्री सायबर गुन्हेगारांना केल्याचा संशय आहे. पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱयांना त्याने संदेश सुविधेद्वारे (मेसेंजर) ओटीपी दिले होते. तो सोशल मीडियावर संपर्क सुविधेद्वारे काही पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ओडिशा ‘एसटीएफ’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 अभिजीत जांबुरे याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाटण तालुक्यातील किहे येथील शाळेत झाले. दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कराड येथे त्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठात त्याने सांख्यिकी विषयातही पदवी घेतली आहे. पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये तो सॉफ्टकेअर इंजिनीअर म्हणून काम करीत होता.

पाकिस्तानच्या दानिशच्या संपर्कात

आरोपी अभिजीत जांबुरे 2018पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. तो सोशल मीडियावर संदेश यंत्रणेद्वारे फैसलाबाद खानकी येथील दानिश अलिस सय्यद दानिश अली नक्वी याच्या संपर्कात होता. दानिशने अभिजितला अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करीत असल्याची बतावणी केली होती. अभिजितने त्याचा ई-मेल आणि सांकेतिक शब्द दानिशला दिला होता. दानिश अभिजितच्या सल्ल्यानुसार माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करीत होता. दानिशला मिळणारी रक्कम तो अभिजितच्या खात्यात जमा करीत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.