पुणे पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, 2200 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त

नशामुक्त पुणे शहर करण्यासाठी पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्या तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने कुरकुंभ एमआयडीसीतील ‘अर्थकेम लॅबोरेटीज’ कंपनीत मोठी कारवाई करून तब्बल 1400 कोटींपेक्षा जास्त किमतीचे 700 किलो मेफेड्रॉन जप्त केले, तर गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने दिल्लीत छापे टाकून 800 कोटी रुपयांचे 400 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. याचे धागेदोरे आणखी खोलवर जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सतीश गोवेकर, सुनील तांबे उपस्थित होते. अमली पदार्थतस्करी करणाऱया आंतरराष्ट्रीय तस्करांना गुन्हे शाखेच्या युनिट-1ने तिघांना नुकतीच अटक केली होती. त्यांच्याकडून तीन कोटी 58 लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले होते. त्यानंतर पथकाने सोमवारी (19 रोजी) रात्री उशिरा विश्रांतवाडीतील एका गोदामात छापा टाकून 55 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत छापा टाकून तब्बल 700 किलोपेक्षा जास्त एमडी जप्त केले आहे, तर दुसऱया पोलीस पथकाने नवी दिल्लीत छापेमारी करीत तब्बल 800 कोटींचे 400 किलो मेफेड्रॉन जप्त केले.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदूम, गौरव देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, नीलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, अय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीत सुरू होते उत्पादन

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटीज कंपनीत छापा टाकला. तेथून 700 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेने दोन दिवसांमध्ये 1100 किलो मेफेड्रॉन जप्त केले असून, आजवरच्या इतिहासात पुणे पोलिसांनी केलेली सर्वांत मोठी कारवाई आहे. कुरकुंभमधील कारखानामालक अनिल साबळे याला पोलिसांनी डोंबिवलीतून ताब्यात घेतले आहे.

तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

मेफेड्रॉन तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. नशामुक्त पुणे शहर करण्यासाठी अमली पदार्थतस्करांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा आमचा ध्यास असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईचा अनेकांनी धसका घेतला आहे.

अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार तस्करांविरुद्ध ठोस कारवाई केली जात आहे. याप्रकरणी तपासाच्या अनुषंगाने आता देशातील विविध भागांत पथके रवाना केली आहेत. त्याशिवाय राज्याबाहेर कारवाईसाठी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेणार आहे.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर