शीवच्या रेल्वे पुलावर 26 जानेवारीनंतर हातोडा, रेल्वेची तयारी पूर्ण

शंभर वर्षांहून अधिक जुना असलेल्या शीव स्थानकानजीकच्या रेल्वे पुलावर प्रजासत्ताक दिनानंतर हातोडा पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. रेल्वेकडून सदर पूल पाडला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी रेल्वेने पूर्ण केली आहे. त्यामुळे पालिका आणि वाहतूक विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर तत्काळ पाडकाम हाती घेतले जाणार आहे. सदरचे पाडकाम पूर्ण करण्यासाठी रेल्वेला तब्बल सहा महिने लागणार आहेत.

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा प्रमुख पूल म्हणून शीवच्या रेल्वे पुलाकडे पाहिले जाते. मात्र सदरचा पूल शंभर वर्षांहून अधिक जुना झाला आहे. तसेच सध्याच्या पुलाखालून पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळेच सदरचा पूल काढून येथे नवा सिंगल स्पॅन गर्डर असलेला लोखंडी पूल बांधण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवून सदरच्या पुलाचे पाडकाम रेल्वे करणार आहे. मात्र हा पूल बंद केल्यानंतर वाहतूककाsंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचे पालिका आणि वाहतूक पोलिसांकडून नियोजन सुरू आहे.

नव्या पुलासाठी 18 महिने लागणार

रेल्वेने पाडकाम सुरू केल्यानंतर ते पूर्ण करून संपूर्ण मलबा हटवण्यासाठी सहा महिने लागणार आहेत, तर आरसीसीचे पिलर उभे करून गर्डर लाँच करण्याबरोबरच संपूर्ण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी 18 ते 24 महिने लागणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार आहे.

असा असणार पूल

सध्याच्या पुलाची लांबी 30 मीटर आहे, मात्र नवीन पुलाची लांबी तब्बल 50 मीटर तर रुंदी 29 मीटर असणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी सुमारे 39 कोटी रुपयांचा खर्च येणार असून रेल्वे 23 कोटी रुपये तर पालिका 26 कोटी रुपये देणार आहे.

शीव स्थानकालगतचा पूल पाडण्याची रेल्वेने तयारी केली आहे. पालिका आणि वाहतूक विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर लगेच काम सुरू करू. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे