दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची भाजपची जुनीच खोड; अंबादास दानवे यांनी सादर केली आकडेवारी

दुसऱ्याच्या श्रेयावर आपले नाव लिहिणे ही भाजपची जुनीच सवय आहे. मग ते राम मंदिर असो वा  महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक, असा सणसणीत टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स या समाजमाध्यमावर भाजपला हाणला आणि महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात आणलेली परकीय गुंतवणूक आणि कोविड नसताना शिंदे सरकारच्या काळात घसरलेली गुंतवणुकीची गाडी याची आकडेवारीच सादर केली आहे.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स समाजमाध्यमावरून केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तामीळनाडू, हरयाणा, तेलंगणा, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा 9 राज्यांची महाराष्ट्राची तुलना करीत महाराष्ट्रात एप्रिल 2022 ते मार्च 14 हजार 806 मिलियन यूएस डॉलर आणि एप्रिल 2021 ते मार्च 2022 या काळात 15 हजार 439 मिलियन यूएस डॉलर गुंतवणूक आल्याचा आकडा समाजमाध्यमावर जारी केला, पण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स समाजमाध्यमावरूनच उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे.

एक्सवर काय म्हटलेय

देवेंद्रजी, आपण ज्या कालखंडाची आकडेवारी इथे दिली आहे, त्या कालखंडात 15 महिने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होते हे पण लक्षात असू द्या. कोविड महामारीने उद्भवलेल्या अडचणींवर मात करून महाविकास आघाडीच्या काळात (2021-22 साली) 15 हजार 439 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक आली. कोविड नसताना तुमची गाडी घसरली आणि 14 हजार 106 मिलियन डॉलर्सवर आली असेच हे आकडे बोलतात. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांतील परकीय गुंतवणुकीतील सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडीच्या काळातील आहे, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी भाजपला आरसा दाखवला आहे.