सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांची लुटमार वाढली; लिंब येथील पोलीस मदत केंद्र बंद

सातारा-पुणे महामार्गावरील वाढे फाटा ते आनेवाडी टोलनाकादरम्यान रात्रीच्या वेळी प्रवाशांची लुटमार करण्याचे प्रमाण वाढले आहे. लिफ्ट मागून लूट करण्याचा फंडा लुटमारीसाठी वापरला जात असून, अंधाराचा फायदा घेत लुटारू पलायन करीत असल्याने या मार्गावरून रात्रीचा प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. लिंब येथील पोलीस मदत केंद्र अनेक वर्षांपासून बंद असल्याने चोरांना वचक राहिला नाही.

पाचवड, भुईंज, रायगाव, सायगाव, मर्ढे, विरमाडे, नागेवाडी आदी भागातील नागरिक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने सातारामध्ये येत असतात. बऱयाचदा या नागरिकांना गावी जाण्यासाठी उशीर होतो. रात्रीच्या वेळी लुटमार करणारे शस्त्र्ाांचा धाक दाखवत प्रवाशांकडून मोबाईल, सोन्याची वस्तू, पैसे काढून घेतात. असे प्रकार या मार्गावर सर्रासपणे होत आहेत.

महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नागेवाडी येथे बांधण्यात आलेले सातारा तालुका पोलीस स्टेशन अंकित मदत केंद्र अनेक वर्षांपासून कुलूपबंद असल्याने चोरटे व लुटारूंसाठी ते वरदान ठरत आहे. लुटमारीने भयभीत झालेले प्रवासी या पोलीस मदत केंद्राकडे मदत मिळावी म्हणून जातात, परंतु ते बंद असल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो.

या भागात चोरीचे प्रमाणही वाढले असून याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. मागील दीड वर्षापासून या मार्गावर पोलीसगस्त वाहन बंद आहे. याचा फायदा चोरटे व लुटारू घेत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

लिफ्ट मागायची; मग लूट करायची

अनेकदा या मार्गावर वाहन बंद पडले आहे, दुर्दैवी घटना घडली आहे, नातेवाईकांचा पुढे अपघात घडला आहे, त्यामुळे त्वरित जावे लागत आहे असे बहाणे करून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीवरील प्रवाशांना अनोळखी व्यक्तींकडून लिफ्ट मागितली जाते. लिफ्ट दिल्यानंतर पुढे काही अंतरावर इतर सहकाऱयांशी सांकेतिक भाषेत संपर्क साधून महामार्गावर प्रवाशांची लुटमार करतात. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना अनोळची व्यक्तीला लिफ्ट देणे धोक्याचे ठरते आहे.

सातारा ते पुणे महामार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे ठरू पाहत आहे. कारण महामार्गाच्या बाजूच्या सेवा रस्त्यावर चोरटे दबा धरून प्रवाशांना अनेकदा शस्त्र्ााचा धाक दाखवित लुटमार करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या मार्गावर प्रवास करताना दक्षता घ्यावी. या मार्गावर रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवणे आवश्यक आहे. नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

– श्रीरंग काटेकर, सातारा