आईबाबांनी मतदान केलं नाही तर 2 दिवस उपाशी राहा! बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याविरोधात कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मुलांचा राजकारणासाठी वापर करणे हे चुकीचे असून याबद्दल बांगर यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सदर प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत बांगर यांच्याविरुद्ध निवडणूक आयोग कारवाई करेल का असा सवाल विचारला आहे.

पालकांनी मत दिले नाही तर विद्यार्थ्यांनी उपाशी राहावे

मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ‘तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा’ असे म्हटले होते. लाख गावातील एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा भयंकर सल्ला दिला होता. ते हा सल्ला देत असताना त्यांच्यासोबतची मंडळी खिदळत असल्याचं व्हिडीओत दिसून आले आहे.

चॅलेंज दिलं, पण अंगलट आलं

वादग्रस्त भूमिका आणि वक्तव्यांमुळे नेहमीच वादात सापडणारे आमदार संतोष बांगर हे त्यांनीच दिलेल्या एका चॅलेंजमुळे याआधी अडचणीत आले होते. कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही असं आव्हान त्यांनी दिलं होतं, पण बांगर यांच्या गटाच्या फक्त 5 जागाच निवडून आल्या. यानंतर बांगर यांनी दिलेल्या चॅलेंजचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर ‘आता मिशा कधी काढताय’ असा प्रश्न विचारला होता.

संतोष बांगर यांना पाहून लग्नमंडपात ‘50 खोके, एकदम ओके’च्या घोषणा

एका लग्न समारंभात सहभागी झालेल्या आमदार संतोष बांगर यांना पाहून कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यांचा चेहरा चांगलाच पाहण्यालायक झाला होता. पाथरी तालुक्यातल्या देवेगाव येथे गेल्या वर्षी जून महिन्यात एक लग्न सोहळा पार पडला होता. या लग्नाला खासदार बंडू जाधव, आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली होती. यावेळी अचानक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी आधी, ‘ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, ‘उद्धव ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ची घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे संतोष बांगर यांची चांगलीच गोची झाली होती. त्यांचा अक्षरशः चेहरा ओशाळला. मंडप परिसरात सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे त्यांनी तिथून लवकर काढता पाय घेतला.