सामना अग्रलेख – धोक्या-खोक्यांचे वर्ष!

सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण. मावळत्या वर्षातील सरकारी दहशतवादाचा हा उच्छाद लोकशाहीचे तमाम स्तंभ उघडय़ा डोळय़ांनी पाहात राहिले. नव्या वर्षात तरी आंधळेपणाचा बुरखा पांघरलेली ही पट्टी सुटेल काय?

मावळत्या वर्षाचा आज अखेरचा दिवस. 31 डिसेंबरची मध्यरात्र उलटली की, सालाबादप्रमाणे भिंतीवर टांगलेले जुने कॅलेंडर खाली उतरतील आणि नवीन कॅलेंडर त्यांची जागा घेईल. दिनदर्शिकेची केवळ पाने बदलतील, पण त्याने काय होणार? हा प्रश्न म्हणून ठीक असला तरी बदलत्या काळासोबत धावावे तर लागतेच! मावळत्या वर्षाला निरोप देऊन आता नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होईल. आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी व नयनरम्य रोषणाईने जगभरातच नवीन वर्षाचे दिमाखदार आगमन होईल. ‘हॅपी न्यू इयर’चे चित्कार करीत थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ांमध्ये संगीताच्या तालावर तरुणाई थिरकू लागेल. केक कापले जातील, मेजवान्या झडतील. नवीन वर्षाच्या स्वागताचा हा हर्षोल्हास, आनंद व सगळाच माहोल मोठा प्रेक्षणीय असतो. मावळत्या वर्षातील दुःखे वा कटू आठवणींना कवटाळून बसण्यापेक्षा काल काय झाले ते विसरून उद्या काय करायचे वा घडवायचे आहे, ते संकल्प निश्चित करून नव्या वर्षाचे स्वागत तर केलेच पाहिजे. वर्ष बदलल्याने  जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात व जगण्या-मरणाच्या प्रश्नांत काही फरक पडणार नाही हे खरेच; कारण जोपर्यंत पृथ्वी, सूर्य, चंद्र, आकाश, तारे आहेत, तोपर्यंत प्रश्न वा दुःखे माणसाची पाठ सोडणार नाहीत. पण दुर्दम्य आशावादी असलेला माणूसही दुःखे आहेत म्हणून

सुखाचा व आनंदाचा पाठलाग

करणे थांबवत नाही. कट-कारस्थाने, दगाबाजी, फसवणूक, कृतघ्नपणा हीदेखील अनादिकाळापासून चालत आलेली विकृती व प्रवृत्ती. भूतकाळाच्या उदरात तीही कधी गडप होत नाहीत. धोके वा षड्यंत्रे कितीही झाली तरी भविष्यकाळाबद्दल असलेल्या विश्वासातून काळ हेच अखेर त्यावर उत्तम औषध ठरते. संकटांवर मात करून बदल वा परिवर्तन घडवण्याची ऊर्जा बदलत्या काळाकडूनच मिळत असते. जुन्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करायचे असते ते यासाठीच! वर्षानुवर्षे, युगानुयुगे हेच सुरू आहे. जुन्या वर्षातील अखेरच्या सूर्यास्ताबरोबर वर्ष सरते आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाबरोबर काळाचा नवा अध्याय सुरू होतो. त्यानुसार एका रात्रीत काळ बदलेल व 2022 साल संपून उद्या 2023 हे नवीन वर्ष सुरू होईल. मावळत्या वर्षाचा धांडोळा घेताना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओढवलेले सर्वात मोठे संकट म्हणजे रशिया व युक्रेनचे युद्ध. जगभरातील अनेक देशांना या युद्धाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दुष्परिणाम भोगावे लागले. हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर मावळते वर्ष देशातील लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले. पाशवी बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेला, सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना भयभीत करण्याचे सत्रच गेले वर्षभर चालवले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा मीडिया एकतर

सरकारने बगलबच्च्यांकरवी

खरेदी केला किंवा धाकदपटशा दाखवून मुख्य प्रवाहातील साऱ्याच प्रसारमाध्यमांची तोंडे बंद केली. सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांचा वाटेल तसा गैरवापर करून तुरुंगात डांबले, पण उशिरा का होईना वर्षाखेरीस न्यायालयात या सरकारी मुस्कटदाबीचे थोबाड फुटले. विरोधी पक्षात असलेले सारेच नेते भ्रष्ट आणि तीच मंडळी ईडी वा सीबीआयच्या धाकाने सत्ताधाऱ्यांच्या छावणीत दाखल झाली की, धुऊन-पुसून स्वच्छ, अशी भलतीच व्याख्या सरत्या वर्षात सरकारने रूढ केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे नको तेवढे व्यक्तिस्तोम माजवले जात असतानाच चीनने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीपासून महागाई, बेकारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली अपमानास्पद घसरण, हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच. पुन्हा यावरून प्रश्न विचारेल त्यांना ब्लॅकमेलर्सचा वापर करून तुरुंगात डांबलेच म्हणून समजा. सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण. मावळत्या वर्षातील सरकारी दहशतवादाचा हा उच्छाद लोकशाहीचे तमाम स्तंभ उघडय़ा डोळय़ांनी पाहात राहिले. नव्या वर्षात तरी आंधळेपणाचा बुरखा पांघरलेली ही पट्टी सुटेल काय?