सामना अग्रलेख – विज्ञानाचे दुश्मन! गर्व से कहो…

द्रमुकची सनातन्यांसंबंधीची मते आणि भूमिका त्यांची स्वतःची आहेत. त्यावर ते सुरुवातीपासून ठाम आहेत. प्रश्न आहे तो खऱ्या हिंदू धर्माचा. कारण खरा हिंदू धर्म सनातन्यांपेक्षा वेगळा आहे. हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. विज्ञान आणि आधुनिकतेचा पुरस्कार करीत संस्कृतीचा ठेवा जपणारे आहे. हिंदुत्व बुवाबाजी, शेंडीजानव्यात, घंटा बडवण्यात, गोमूत्रात अमृत शोधणारे असूच शकत नाही. भाजपचे हिंदुत्व जादूटोणा, बुवाबाजी भ्रमित करणाऱ्या अंधश्रद्धेचे आहे. देश त्यामुळे पुरातन युगातल्या अंधाऱ्या खाईत जाईल. नव्हे, जात आहे.

द्रमुक पक्षाचे खासदार सेंथिलकुमार यांनी संसदेत भाजपच्या तकलादू हिंदुत्वावर टीका केल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. भाजपला राजकीय फायद्यासाठी असे वाद हवेच असतात. द्रमुकसारखे पक्ष भाजपला ही संधी आयतीच देतात. हे राजकीय शहाणपण नाही. सेंथिलकुमार काय म्हणाले? ते म्हणाले, ‘‘भाजपला फक्त हिंदी भाषिक पट्टय़ातच यश मिळते. आम्ही त्यांना गोमूत्र राज्ये म्हणतो.’’ या विधानामुळे संसदेत भाजपच्या गोंधळय़ांनी गोंधळ घातला. द्रमुक पक्ष हा धर्म मानत नाही. हिंदू धर्मातील सनातनी, रूढी-परंपरा, कर्मठपणा, सोवळे-ओवळे, जातीय प्रथा, स्पृश्य-अस्पृश्यता याबाबत त्यांची मते ठाम आहेत व ते त्यावर टीका करतात. हिंदू धर्मात पुरोगामी सुधारणावादी विचारांची मोठी परंपरा आहे. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे अशा समाजधुरिणांनी हिंदू धर्मातील रूढी-परंपरांचा चिखल नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हुंडा प्रथा, बालविवाह, सतीची चाल, केशवपन अशा प्रथांविरुद्ध हिंदू धर्मातच बंड झाले. मंदिरे सगळय़ांसाठीच आहेत. यासाठी साने गुरुजी, वीर सावरकरांनी भूमिका घेतल्या. हिंदुत्वाला आधुनिकतेची जोड देण्याचे काम या सगळय़ांनी केले व त्यास वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या हिंदुहृदयसम्राटांनी बळ दिले. ‘‘मला शेंडी-जानव्याचे, देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व मान्य नाही,’’ असा विचार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी मांडला. गाय हा उपयुक्त पशू आहे. देव, गोमाता नाही, असे सांगून सावरकरांनी हिंदुत्वावर विज्ञानाचे गोमूत्र शिंपडले, पण सध्याचा भाजप देशाबरोबर हिंदुत्वाला सोवळय़ात व शेंडी-जानव्याच्या गाठीत अडकवून ठेवू इच्छित आहे. द्रमुक पक्षाच्या खासदाराने गोमूत्रबाजीवर हल्ला केला, पण भाजपचे हे हिंदुत्व म्हणजे संपूर्ण देशाचे हिंदुत्व नाही. हिंदू म्हणून अभिमान बाळगणारा मोठा वर्ग आधुनिकतेची कास धरतो व त्यांना भाजपच्या शेंडी-जानव्याच्या गाठी मान्य नाहीत. निवडणुका आल्या की, मोदी कपाळास

चंदन आणि भस्म

लावून सोवळे-पितांबरात एखाद्या मंदिरात जातात व त्याची प्रसिद्धी करतात. हे आता नित्याचेच खेळ झाले. गंगाकिनारी अस्पृश्यांचे पाय धुण्याचे सोहळे पार पाडतात, पण त्याच वेळी कश्मीरमधील आक्रोश करणारा हिंदू पंडित, त्यांचे निर्वासित जीवन त्यांना अस्वस्थ करीत नाही. मणिपूरच्या हिंसाचारात मरणारा हिंदू त्यांना दिसत नाही. कश्मीरात होणाऱ्या जवानांच्या हत्या ते उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहेत. भाजप परिवारातील अनेक ‘दवा-दारू-आयुर्वेद’ उद्योजकांनी बाटलीबंद गोमूत्र व गंगाजल विकण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांचे हिंदुत्व तेवढय़ापुरतेच मर्यादित आहे. भाजपवाल्यांकडून गंगाजल वाटपाचे प्रयोग झाले. मात्र त्याच गंगेत कोविड काळात हजारो प्रेते तरंगत होती. कारण भाजपशासित उत्तर प्रदेशात तेव्हा जिवंत रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाहीत व गोमूत्र शिंपडून त्या तडफडणाऱ्या जिवांचे प्राण वाचवता आले नाहीत, हे त्रिवार सत्य आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हाच खऱ्या हिंदुत्वाचा मंत्र आहे, पण गेल्या आठ वर्षांत किती वचनांची पूर्तता झाली? महागाईपासून बेरोजगारीपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे कोटय़वधी हिंदू बेरोजगार आहे व मोफत रेशन (5 किलो) देऊन भिकारी बनवणे हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. भारतीय संविधानाचा रोज गळा घोटला जात आहे. हे कोणत्या प्रकारातले हिंदुत्व मानायचे? प्रश्न इतकाच आहे, भाजपसाठी हिंदुत्व हा राजकीय खेळ आहे व या खेळास हिंदी भाषिक पट्टय़ात थोडी बरकत आली आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहिले ते काही गोमूत्र शिंपडून नाही. त्यासाठी शिवसेनेसह हजारो करसेवकांनी त्यांच्या रक्ताचे शिंपण केले, प्राण गमावले हे सत्यच आहे. तेव्हा 2024 ची लढाई भाजपच्या नकली हिंदुत्वाविरुद्ध आहे हे समजून घेतले पाहिजे. भाजपचे हिंदुत्व जादूटोणा, बुवाबाजी व भ्रमित करणाऱ्या अंधश्रद्धेचे आहे. देश त्यामुळे पुरातन युगातल्या

अंधाऱ्या खाईत

जाईल. नव्हे, जात आहे. हिंदू धर्मास ते असे कफल्लक करून ठेवतील की एक दिवस ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे अभिमानाने बोलण्याची लाज वाटू लागेल. कोणी काय खावे, कोणते कपडे घालावेत हे सगळे हेच ठरविणार. निवडणुकांमध्ये हिजाब वगैरे विषय पेटवायचे आणि त्यावर स्वतःच्या राजकीय पोळय़ा भाजून घ्यायच्या. राजस्थानात आता भाजपची सत्ता येताच त्या पक्षाच्या एका आमदाराने जयपूरमध्ये रस्त्यावर उघडपणे फिरत मांसाहारी हॉटेल आणि मांसविक्रीची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. असे हिंदुत्व काय कामाचे? एकीकडे गोमांस बंदीचा देखावा करायचा आणि दुसरीकडे काही भाजपशासित राज्यांत गोमांस विक्रीला कायदेशीर संरक्षण द्यायचे. भाजपच्याच नेते-मंत्र्यांनी गोमांस खात असल्याचे जाहीरपणे सांगायचे. भाजपचे हिंदुत्व हे असे बेगडी आहे. अफगाणिस्तानच्या तालिबानी पद्धतीचे हिंदुत्व ही मंडळी राबवू पाहत आहेत व हा देशाला सगळय़ात मोठा धोका आहे. द्रमुक पक्षाचे खासदार सेंथिलकुमार यांनी भाजप आणि गोमूत्राच्या संबंधांवरून केलेल्या टीकेशी सहमत असण्याचे कारण नाही. मात्र सेंथिलकुमार यांनी आता त्यासंदर्भात माफी मागितली आहे. आपल्या मनात कोणतीही वाईट भावना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विनाकारण उठलेल्या वादावर आता पडदा पडायला हवा. द्रमुकची सनातन्यांसंबंधीची मते आणि भूमिका त्यांची स्वतःची आहेत. त्यावर ते सुरुवातीपासून ठाम आहेत. प्रश्न आहे तो खऱ्या हिंदू धर्माचा. कारण खरा हिंदू धर्म सनातन्यांपेक्षा वेगळा आहे. हिंदुत्व सर्वसमावेशक आहे, प्रॅक्टिकल आहे. विज्ञान आणि आधुनिकतेचा पुरस्कार करीत संस्कृतीचा ठेवा जपणारे आहे. हिंदुत्व चंद्राकडे झेप घेणारे व सूर्याला गवसणी घालणारे आहे. त्याच वेळी त्या श्रद्धांना नमस्कार करणारे आहे. हिंदुत्व बुवाबाजी, शेंडी-जानव्यात, घंटा बडवण्यात, गोमूत्रात अमृत शोधणारे असूच शकत नाही. भाजपचे हिंदुत्व मात्र एक दिवस तुम्हा-आम्हाला वल्कले गुंडाळून फिरायला लावेल. देश त्याच दिशेने चालला आहे.