सामना अग्रलेख – युद्ध संपेल काय?

इस्लामच्या आधारावर ‘पाकिस्तान’ व ‘ज्यू’ धर्मीयांसाठी इस्रायलची निर्मिती झाली. पाकिस्तानात लोकशाही कधीच नांदली नाही. धर्माच्या नावावर निर्माण झालेले हे राष्ट्र धर्मांध शक्ती व लष्कराच्या जबड्यात गुदमरून प्राण सोडताना दिसत आहे. दुसरे धार्मिक राष्ट्र इस्रायल. ते ‘ज्यूं’नी लढून मिळवले. आपल्या कष्टाने, बलिदानाने ते प्रगत व आधुनिक बनवले, पण एका धर्माने आपल्या अस्तित्वासाठी दुसऱया धर्मावर आक्रमण करून त्यांना मागे ढकलले. त्यातून सतत संघर्षाच्या ठिणग्या व युद्धाचा भडका उडत राहिला. त्यामुळे देश मिळूनही ज्यू लोकांना मानसिक शांतता नाही. धर्माच्या नावाने देश उभे राहतात, पण त्यांची शांतता व मानसिक स्वास्थ्य हरवून जाते. इस्रायल-हमासमधील सध्याचे युद्ध तेच सांगते! हे युद्ध संपेल काय? हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आता तरी कोणाकडेच नाही.

इस्रायल-हमास युद्ध पंधरा दिवसांनंतरही सुरूच आहे. इस्रायलसारख्या संरक्षणदृष्ट्या बलाढ्य देशाला हमासबरोबरचे युद्ध पंधरा दिवसांनंतरही संपवता आलेले नाही हे त्यांचे अपयश आहे. इस्रायल एक सैनिकी राष्ट्र आहे. इस्रायलची संरक्षण सिद्धता, त्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन, तंत्रज्ञान याबाबत बरेच काही बोलले जाते, पण फक्त तंत्रज्ञान आणि विज्ञानावर युद्ध जिंकता येत नाही. इस्रायल पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे व हमास, हिजबुल्ला जमिनीवर आहे. गाझाच्या सीमेवर इस्रायलचे साडेतीन लाख सैन्य खडे आहे, पण जमिनीवरील युद्ध लढण्याच्या मानसिकतेत इस्रायल दिसत नाही. इस्रायलच्या सैनिकी क्षमतेसंदर्भात ज्या दंतकथा होत्या, त्या दंतकथांना भेदून हमासने हल्ला केला व त्या हल्ल्यानंतर इस्रायलची सेना बराच काळ प्रतिकार करू शकली नाही. आजही इस्रायलकडून फक्त हवाई हल्ल्यांचाच जोर आहे. त्यांनी गाझा पट्टीतील इस्पितळे, नागरी वस्त्यांवर हल्ले करून हजारो पॅलेस्टिनी जनतेस ठार केले. हमास-इस्रायल युद्धापासून लोकशाही मानणाऱया देशांनी धडा घेतला पाहिजे. तंत्रज्ञान, विज्ञानाने देशाच्या सीमेवर कितीही मजबूत भिंती उभ्या केल्या तरी त्या अभेद्य आणि अजिंक्य नाहीत. हमासकडे कोणतेही तंत्रज्ञान नाही तरी ‘पहाटे’ त्या भिंती ओलांडून हमासचे लोक इस्रायलच्या हद्दीत घुसले व त्यांनी 12 ठिकाणी हल्ले केले. इस्रायल हा आपल्या सुरक्षेबाबत जागरूक देश असल्याचा भ्रम येथे तुटला. या सर्व 12 चेकपोस्टवर रडार्स, अत्याधुनिक कॅमेरे, शस्त्रसज्जता होती, पण तरीही हमासचे दहशतवादी इस्रायलच्या भूमीत घुसले. इस्रायल हे सैनिकी राष्ट्र आहे. म्हणजे या राष्ट्रास हमास, पॅलेस्टाईन, लेबनॉनकडून सतत हल्ल्याचा धोका आहे. इस्रायलच्या नागरिकांना सैनिकी शिक्षण व सैनिकी सेवा सक्तीची आहे. येथील महिलांना 22 महिने, तर पुरुषांना साधारण पाच-सात वर्षे सैनिकी सेवा बजावावी लागते. हे सैन्य म्हणजे हवेच्या झोक्यासारखे आहे. दोन-पाच वर्षांच्या सेवेनंतर या

सैनिकांना पुन्हा दुसरा कामधंदा

शोधावा लागतो. याच पद्धतीने मोदी यांनी आपल्या देशात कंत्राटी सैनिकांची ‘अग्निवीर’ योजना आणली. दोन-पाच वर्षे अंगावर लष्करी गणवेश चढवा व नंतर बेरोजगार होऊन रस्त्यावर ‘पकोडे’ तळत बसा. अशाने देश सैनिकीदृष्ट्या बलवान होतो हा ‘समज’ इस्रायलच्या भूमीवर तुटला आहे. इस्रायलसारखे प्रबळ सैनिकी राष्ट्र गेले पंधरा दिवस आपल्या संरक्षणासाठी झुंजताना जग पाहत आहे. कंत्राटी सैनिकांचे मनोबल व मानसिकता ही ‘नोकरी’ करून परतण्याची आहे, रणांगणावर जिद्दीने लढण्याची नाही. रशियातील कंत्राटी सैन्य तर पुतीन यांच्यावरच उलटले. इस्रायलमध्येही नागरिक, माजी लष्करी अधिकारी नेतान्याहू सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले व नेतान्याहू यांच्यामुळे हे युद्ध लादले असा त्यांचा आरोप. यावर इस्रायलच्या पोलीसप्रमुखांनी काय धमकी द्यावी? ‘‘जे युद्धास विरोध करतील त्यांना अटक करून ‘गाझा’ येथे युद्धासाठी पाठविले जाईल.’’ एका सैनिकी राष्ट्राच्या पोलीसप्रमुखांचे असे बोलणे ही त्यांची हतबलता दर्शविते. गाझाच्या सीमेवर साडेतीन लाखांचे सैन्य उभे आहे, पण सरकारविरोधी आंदोलन कराल तर ‘गाझा’ला पाठवू, तेथे युद्ध करून मरा, अशी ही धमकी आहे. हे धोरण इस्रायलने भारताकडून स्वीकारले की भारताने इस्रायलकडून स्वीकारले? भारतात सरकारविरुद्ध बोलणाऱयांना ‘पाकिस्तानात’ पाठविण्याची भाषा केली जाते, नाहीतर सरळ तुरुंगात पाठवून छळ केला जातो. भारताने स्वतंत्र पॅलेस्टाईनला सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. हमास ही संघटना पॅलेस्टिनी जनतेचे प्रतिनिधित्व करीत नाही. त्यामुळे हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी गाझा पट्टीतील जनतेचा संबंध नाही. मात्र हल्ला होताच पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ त्यांचे मित्र, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू यांना पाठिंबा दिला. मात्र देशात त्यावरून गोंधळ होताच पुढे पॅलेस्टिनी जनतेचे स्वतंत्र अस्तित्व भारताने मान्य केले. आता तर युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी काही टन औषधे आणि इतर जीवनावश्यक

साधनसामग्री पाठवली

आहे. इस्रायल-हमास युद्धाबाबत हे धोरण मोदी सरकारचा गोंधळ दाखविणारे आहे. इस्रायलचे सैन्यबळ हे मध्यपूर्वेतले मोठे लष्करी साम्राज्य आहे, पण युद्ध संपवणे त्यांच्या हाती नाही. त्यात आता लेबनॉनच्या सीमेवरून नवे हल्ले सुरू झाले आहेत. इस्रायलच्या भूमीवर जो बायडेन, ऋषी सुनक आले व गेले. त्यांनी इस्रायलला पाठिंबा दिला. अमेरिकेची लढाऊ विमाने इस्रायलच्या मदतीस पोहोचली, पण लेबनॉनमधील ‘हिजबुल्ला’चे दहशतवादी जमिनीवरील युद्धात अधिक अनुभवी आहेत. इस्रायल-हमास युद्ध जितके लांब खेचले जाईल, तितके इस्रायलचे मनोबल कमी होईल. कारण नेत्यांना युद्ध हवे असले तरी जनतेला ते नको आहे. धर्माच्या नावावर निर्माण झालेली फक्त दोनच राष्ट्रे जगाच्या नकाशावर आहेत. इस्लामच्या आधारावर ‘पाकिस्तान’ व ‘ज्यू’ धर्मीयांसाठी इस्रायलची निर्मिती झाली. दोन्ही राष्ट्रांच्या दोन तऱहा आहेत. पाकिस्तानात लोकशाही कधीच नांदली नाही. धर्माच्या नावावर निर्माण झालेले हे राष्ट्र धर्मांध शक्ती व लष्कराच्या जबडय़ात गुदमरून प्राण सोडताना दिसत आहे. तेथे फक्त अराजक आहे व तो देश भिकेचा कटोरा घेऊन जगात उभा आहे. दुसरे धार्मिक राष्ट्र इस्रायल. ते ‘ज्यूं’नी लढून मिळवले. आपल्या कष्टाने, बलिदानाने ते प्रगत व आधुनिक बनवले, पण एका धर्माने आपल्या अस्तित्वासाठी दुसऱया धर्मावर आक्रमण करून त्यांना मागे ढकलले. त्यातून सतत संघर्षाच्या ठिणग्या व युद्धाचा भडका उडत राहिला. इस्रायलच्या स्थापनेपासून हा ‘भडका’ पेटलेलाच आहे. त्यामुळे देश मिळूनही ज्यू लोकांना मानसिक शांतता नाही. कधीही बॉम्ब पडतील, आत्मघातकी हल्ले होतील, धोक्याची जाणीव करून देणारे सायरन वाजतील व आपापल्या घराखालच्या बंकर्सखाली लपावे लागेल अशा युद्धछायेत हा देश आज जगतो आहे. धर्माच्या नावाने देश उभे राहतात, पण त्यांची शांतता व मानसिक स्वास्थ्य हरवून जाते. इस्रायल-हमासमधील सध्याचे युद्ध तेच सांगते! हे युद्ध संपेल काय? हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आता तरी कोणाकडेच नाही.