साडय़ा नेसून लुटमार करणारे दरोडेखोर गजाआड, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर पोलिसांची कारवाई

महामार्गावर साडय़ा नेसून, स्त्र्ााrवेश धारण करून प्रवाशांना लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना गजाआड करण्यात संगमनेर पोलिसांना यश आले. गुरुवारी (13 रोजी) नाकाबंदीदरम्यान या टोळीला पकडण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीनंतर संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध जबरी चोऱया, घरफोडी आणि दरोडे यांचा तपास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संजय मारुती शिंदे (वय 25, रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23), सुनील बाबूराव सावंत (वय 32), राजेश शंकर शेगर (वय 25), साजन शिवलाल चव्हाण (वय 25), किशोर महादेव इंगळे (वय 21, सर्व रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि, बुलढाणा) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मागील काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱयांचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहनधारकांना लुटण्याच्या घटना, रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहनचोरी करणारी टोळी सतर्क झाली होती. याला आळा घालण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांच्या वतीने प्रयत्न सुरू होते. यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. त्यानुसार शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये सापळा रचण्यात आला होता. यासोबत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. गुरुवारी संगमनेर शहरातील मच्छी चौक, पावबाकी रोड येथे नाकाबंदीदरम्यान एक संशयित कार पोलिसांना हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती. पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून पकडले. त्या वाहनातील सहाजणांकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्या सहाजणांना ताब्यात घेत कारची तपासणी केली असता, त्यामध्ये लाकडी दांडे, लोखंडी टॉमी, गज, मिरचीपूड, साडय़ा व रोख रकमेसह दोन लाख 83 हजारांचा मुद्देमाल सापडला.

संगमनेर पोलिसांनी सहाजणांना अटक केली असून, तपास सुरू आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व परिसरात जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, हवालदार विजय खाडे, पोलीस नाईक विजय पवार, पोलीस शिपाई विशाल कर्पे, रोहिदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, अजित कुऱ्हे, अतुल उंडे यांनी केली असून, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार तपास करीत आहेत.

साडय़ा नेसून प्रवाशांना लुटण्याची पद्धत

अटक केलेल्या दरोडेखोरांच्या कारमध्ये साडय़ा आढळून आल्या. पोलिसांनी यासंदर्भात त्या सहाजणांकडे चौकशी केली असता, त्यांनी महामार्गावर साडय़ा नेसून, स्त्री वेश धारण करून कारचालकांना थांबवायचे. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करीत गाडीसह सोने, मोबाईल, रोख रक्कम लुटायचे.