वसंतवेली – देखणी अभिनेत्री

>> संजय कुळकर्णी

प्रत्येक नायिकेच्या अभिनयाची जातकुळी वेगळी होती आणि त्यांनी आपलं वेगळेपण जपलं. एक नायिकापर्व अनुभवलं. ‘वसंतवेली’तील आजची देखणी नायिका उमा भेंडे.

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नायिका आल्या आणि आपलं अस्तित्व ठेवून गेल्या. त्यांचं दिसणं, त्यांचा अभिनय हा सर्व मोहवून टाकणारा होता. मराठी चित्रपटसृष्टीचा तो सुवर्णकाळ होता. प्रत्येकीचे चित्रपट गाजले. त्यांनी आपलं नाव चित्रपटसृष्टीत रोवलं. परंतु प्रत्येक नायिकेच्या अभिनयाची जातकुळी वेगळी होती आणि म्हणूनच त्या आपलं वेगळेपण जपू शकल्या. त्यामुळे प्रेक्षकांनी एक नायिका पर्व अनुभवलं. ‘वसंतवेली’तील पुढची देखणी नायिका उमा भेंडे.

कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात उमा यांचा जन्म झाला. त्यांची आई रमादेवी या कोल्हापूरच्या प्रभात कंपनीत काम करत होत्या आणि वडील दिनकर साकरीकर आचार्य अत्रे यांच्या नाटक कंपनीत होते. अनुसूया हे त्यांचं पाळण्यातील नाव. लतादीदींनी त्यांना ‘उमा’ हे नाव दिलं. त्याच नावाने त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. भालजी पेंढारकर यांच्याकडे त्यांची आई त्यांना लहान असताना घेऊन गेली. भालजींना लहानपणीच्या उमा आवडल्या आणि त्याच सुमारास ते ‘आकाशगंगा’ हा चित्रपट करत होते. त्यांनी उमा यांची छोटय़ा सीतेच्या भूमिकेसाठी निवड केली. असा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाल्यानंतर त्यांना ‘अंतरीचा दिवा’मध्ये नायकाच्या बहिणीची भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 15 वर्षं त्या नायिका म्हणून रुपेरी पडद्यावर वावरल्या. एकामागून एक हिट चित्रपटांची रांगच लागली.

मंगला खाडिलकर उमा भेंडे यांच्याबद्दल म्हणाल्या, “शालीनता आणि सुसंस्कारित असणं म्हणजे काय याचा एक वस्तुपाठ म्हणजे उमा भेंडे! ‘वसंतवेली’तील ही पाचवी नायिका. सैंदर्य, चेहऱयाची ठेवण, रेखीव चेहरा नायिकेचा कसा असावा, तर उमा भेंडे यांच्या प्रसन्न मुद्रेतून तो दिसायचा. ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ हा चित्रपट आठवला आणि ’ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले…’ हे गाणं आठवतं आणि उमा भेंडे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 1963 साली ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद भालजी पेंढारकर यांनी लिहिले. माधव शिंदे हे दिग्दर्शक होते. काही कारणास्तव ‘थोरातांची कमळा’च्या नायिकेची भूमिका करणाऱया अभिनेत्रीला त्यात काम करता येणार नव्हते. मग उमा यांच्याकडे ती भूमिका चालून आली आणि त्यांनी त्या भूमिकेचं सोनं केलं. रसिकांच्या मनावर भुरळ घातली. पडद्यावर कोणत्याही भूमिकेत सहज वावरणं ही त्यांची खासियत होती. 60-70च्या दशकात उमा भेंडे यांनी यशस्वी चित्रपटांचा आलेख हा शेवटपर्यंत चढताच ठेवला. क्षण आला भाग्याचा, शेवटचा मालुसरा, पाहू रे किती वाट, स्वयंवर झाले सीतेचे, आम्ही जातो अमुच्या गावा, मल्हारी मार्तंड, दैव जाणिले कुणी, मधुचंद्र, धरतीची लेकरं, अंगाई आणि भालू अशी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावं आहेत. प्रत्येक चित्रपटाचे नाव वाचताना तो डोळ्यांसमोर येतो आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकासुद्धा.

काय गंमत आहे पहा की, ‘नाते जोडले दोन जीवांचे’ या चित्रपटाच्या निमित्ताने उमा यांची प्रकाश भेंडे यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी त्यांना आपला जीवनसाथीच निवडला. प्रकाश भेंडे यांची ‘श्री प्रसाद चित्र’ चित्रपट संस्था होती. त्यांनी उमा भेंडे नायिका असलेल्या चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार आणि भालू या चित्रपटांची निर्मिती केली. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे या जोडीचं नाव घेतलं की ‘भालू’ हा त्या दोघांचा चित्रपट आठवतो. प्रकाश भेंडे यांचं उमावर इतकं प्रेम होतं की, ‘सोल ब्रीदिंग’ या प्रकाश भेंडे यांच्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन उमा भेंडे यांनी केलं होतं. त्यांनी काढलेल्या चित्रांची समीक्षक म्हणून ते उमाला मानायचे. काढलेलं प्रत्येक चित्र उमाला दाखवून तिला समीक्षकाचा मान द्यायचे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी जे काही मोजकेच चित्रपट केले त्यात ‘दोस्ती’ या चित्रपटाचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्या चित्रपटातील ‘गुडिया हमसे रुठी रहोगी…’ हे उमावर चित्रित केलेलं गाणं आठवतं. तसंच ’आम्ही जातो अमुच्या गावा’ मधलं ‘हवास मज तू हवास तू…’ या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टी एका देखण्या अभिनेत्रीला मुकली. अशी ही ‘वसंतवेली’तील पाचवी सोज्वळ नायिका.

[email protected]