भाजपने चंद्रयानावरून जरी प्रचार केला तरी आम्हाला फरक पडत नाही! संजय राऊत यांची सडकून टीका

भाजप या वर्षीच्या अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुका घेण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून देशातील सर्व हेलिकॉप्टरची बुकिंग करण्यात आली आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. जर भाजपने विमानं आणि हेलिकॉप्टर बुक केली असतील तर आम्ही पायी प्रचार करू. आम्ही जमिनीवर जनतेसोबत राहू असे राऊत यांनी म्हटले.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, त्यांनी विमानं आणि हेलिकॉप्टर बुक केली असतील तर आम्ही पायी प्रचार करू. तुम्ही हवेत उडत राहा, आम्ही जमिनीवर जनतेसोबत राहू. आम्हाला चिंता नाही. तुम्ही विमानं उडवा, हेलिकॉप्टर उडवा, इतकंच काय भाजपने प्रचारासाठी चंद्रयान जरी आणलं आणि त्यावरून त्यांनी प्रचार केला तरी आम्हाला फरक पडत नाही.

राऊत यांनी म्हटले की, बाबरी, अयोध्येचा मुद्दा संपलेला आहे. तो कोणी काढत असेल तर ते मूर्ख आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने संपवलेला असल्याने तिथे राममंदिर उभं राहतंय त्याचं श्रेय कोणी घेऊ नये. कोणाला श्रेय द्याचे असेल तर जे हजारो करसेवक मारले गेले, शहीद झाले त्यांना द्यावे लागेल. त्यात शिवसेनेचा सहभाग आहे. ते पुढे म्हणाले की, “राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यावेळी संपूर्ण देशातून लोकांना बोलावू, देशभरातून ट्रेनने सोडून ट्रेनवर दगडफेक, आगीचे गोळे फेकून देशात दंगली भडकावल्या जातील अशी शंका लोकांच्या मनात आहे. अशा घटना सरकारने रोखल्या पाहिजेत.”

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमधील चर्चा चोरून ऐकण्यासाठी सत्ताधारी ‘बग’ लावणार असल्याची चर्चा असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राऊत यांनी म्हटले की, “बग लावा नाहीतर बॉम्ब लावा आम्ही घाबरत नाही.” या बैठकीला देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते येणार असून या बैठकीसंदर्भात 30 ऑगस्ट रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती राऊत यांनी दिली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार का असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी मुंबईतील बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीचा खासदार मिळून 19 खासदार कायम राहतील.,ते कमी होणार नाही. एकवेळ 19 चे 20 खासदार होतील मात्र 19 चे 15 होणार नाही.