नार्वेकरांची निवड हा सर्वात मोठा फ्रॉड, संजय राऊत यांची टीका

‘‘राजकीय पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची झालेली निवड हा सर्वात मोठा फ्रॉड आहे. आतापर्यंत दहा पक्षांतरे पचवून ढेकर देणाऱया माणसाने शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली. भाजपचा हस्तक म्हणून नार्वेकर यांनी निकाल दिला. हा संविधान आणि घटनेचा अपमान आहे,’’ अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत हे सोमवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘ईडी ही भाजपची एक्स्टेंडेड ब्रँच आहे. बारा-तेरा वर्षांपूर्वीच्या लहान-लहान गोष्टी काढायच्या अन् दोन-पाच लाखांसाठी चौकशी करायची. जे भाजपसोबत जात नाहीत त्यांना त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली जात आहे. भाजपसोबत गेल्यावर कारवाई बंद केली जाते. हे चित्र देशासाठी चांगले नाही. भाजपसोबत गेल्यावर सगळय़ा चौकशा बंद होतात. अजित पवार यांचा 70 हजार कोटींचा घोटाळा, शिखर घोटाळा, प्रफुल्ल पटेल यांचे घोटाळे हे तर पंतप्रधान सांगतात. दादा भुसे, राहुल कुल यांना नोटीस पाठविताना ईडीची शाई संपते का?’’ असा सवाल करीत, ‘‘आमच्यासाखी माणसे झुकणार नाहीत. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाका. एकदा टाकून झाले आहे, परत टाका. किती दिवस तुरुंगात टाकणार? तुम्ही आम्हाला फासावर जरी लटकावले तरी आम्ही देशातील हुकूमशाहीविरोधात लढू. आम्ही मागे हटणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी दिला.

मुलुंडचा पोपटलाल मोकळा कसा?
‘‘मुलुंडचा जो नागडा पोपटलाल आहे, त्याने ‘आयएनएस विक्रांत बचाव’च्या नावाखाली कोटय़वधी रुपये गोळा केले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात खालच्या कोर्टात त्याला आणि त्याच्या मुलाला जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी जामीन ‘मॅनेज’ केला. सरकार आल्यावर त्यांच्यावरील एफआयआर काढून टाकला. मग हा मुलुंडचा पोपटलाल मोकळा कसा?’’ असा सवालही संजय राऊत यांनी केला.

गृहमंत्री आहेत की ‘सागर’ बंगल्यावरील गुंडांचे बॉस?
भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर ‘पॅश ऑफ क्युरी’चा आरोप झाला आहे. त्याबाबत विचारले असता, खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘राज्याचे गृह मंत्री खरोखरच कारवाई करायला समर्थ आहेत का? ते गृह मंत्री आहेत की ‘सागर’ बंगल्यावरील गुंडांचे बॉस आहेत, हे आधी स्पष्ट व्हायला हवे. आता गृह मंत्र्यांवरच सुनावणी व्हायला हवी. ते गृह मंत्री आहेत की त्यांचा आमदार म्हणतो त्याप्रमाणे, ते ‘सागर’ बंगल्यावरील गुंडांचे बॉस आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे.’’