Sarfaraz Khan – सरफराज खानच्या पदरी पुन्हा निराशा, रजत पाटीदारची संघात निवड

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला विशाखापट्टपण येथे सुरूवात झाली असून या सामन्यासाठी टीम इंडियाने तीन बदल केले आहेत. के.एल.राहुल आणि रवींद्र जाडेजा हे दोघे जायबंदी असल्याने या दोघांच्या जागी रजत पाटीदार आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला आराम देऊन त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यापूर्वी संघात रजत पाटीदारला संघात स्थान मिळणार का स्थानिक पातळीवर लाजवाब कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला संधी मिळणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले होते. मात्र यावेळीही सरफराज खानच्या पदरी निराशा पडली असून रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आलं आहे.

इंग्लंडने केला फिरकीचा अभ्यास

हिंदुस्थानी खेळपट्टय़ा फिरकीधार्जिण्या असल्याने इंग्लंडचा संघ फिरकी गोलंदाजीचा व्यवस्थित अभ्यास करून हिंदुस्थानच्या दौऱयावर आला होता. पहिल्या कसोटीत त्यांनीच हिंदुस्थानची फिरकी घेत पहिल्या कसोटीत बाजी मारली. ओली पोपने दुसऱया डावात स्वीप व रिवर्स स्वीपचा वापर करीत हिंदुस्थानी फिरकीचा समर्थपणे सामना करत 196 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. मात्र यावेळी रविचंद्रन अश्विन व वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीला ‘चायनामन’ कुलदीप यादव असल्याने हिंदुस्थानच्या या फिरकीच्या त्रिकुटापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची खरी ‘कसोटी’ लागणार आहे.

इंग्लंडच्या संघात दोन बदल

इंग्लंडने दुसऱया कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला आपल्या संघाची घोषणा केली. विशाखापट्टणमच्या वायझाग स्टेडियमवर होणाऱया या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त जॅक लीचच्या ऐवजी इंग्लंडचा युवा फिरकीपटू शोएब बशीरचा समावेश केला आहे. तो व्हिसा प्रक्रियेत गोंधळ झाल्याने पहिल्या कसोटीपूर्वी हिंदुस्थानात येऊ शकला नव्हता. इंग्लंडने आपल्या संघात अजून एक बदल केला असून पहिल्या कसोटीतील एकमेव वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या ऐवजी अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. इंग्लंडने तीन फिरकीपटूंसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जेम्स अँडरसन हा हिंदुस्थानात आपली 14 वी कसोटी खेळणार आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने मार्क वूड हा एकमेव वेगवान गोलंदाज खेळवला होता, मात्र दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्स हा गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे इंग्लंडकडे आता पाच गोलंदाज झालेत.