शरद पवारांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या भगिनी व दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. आमच्या पवार कुटुंबात कोणतेही मतभेद नाहीत. राज्याच्या राजकारणाची जाण असलेल्या शरद पवार यांच्या मागे महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहील, असा विश्वास सरोज पाटील यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची पुन्हा सत्ता नको असेल तर जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबात एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार हे सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार, पुतणे युगेंद्र पवार हे कुटुंबातील सदस्य शरद पवारांसोबत खांद्याला खांदा लावून भाजपविरोधात लढताना आता दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार शरद पवारांकडे परतत आहेत. आता सरोज पाटील यांनीही शरद पवारांना खंबीर साथ दिली आहे.

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत; चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला
भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर सूडाच्या भावनेतून टीका केली. या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करायचे असल्याचे चुटकी वाजवून त्यांनी केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होऊ लागली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचाही सरोज पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. कितीही खोटेनाटे आरोप करून देवाला साकडे घाला, राम मंदिराला जावा; पण शरद पवारांचा पराभव करणे शक्य नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘शरद पवार यांचे काम लोक जाणतात. त्यामुळे कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत,’ असा टोलाही सरोज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.