बांगलादेशसाठी शाकिब आणि मुशफिकर खेळणार पाचवा वर्ल्ड कप

असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना आपल्या कारकीर्दीत एकही वर्ल्ड कप खेळण्याचे भाग्य लाभले नाही. पण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन सर्वात अनुभवी खेळाडू असेल. बांगलादेशने अद्याप आपला वर्ल्ड कप संघ जाहीर केला नसला तरी शाकिब आणि मुशफिकर रहीम ही अनुभवी जोडगोळी सलग पाचव्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनुभवी खेळाडूंची फार मोठी यादी नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच खेळाडू आपला चौथा किंवा पाचवा वर्ल्ड कप खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचीच गोष्ट घेतली तर या संघात एकटा स्टीव्हन स्मिथच आपला चौथा वर्ल्ड कप खेळणार आहे. त्याचा अपवाद वगळता त्याच्याइतका अनुभवी खेळाडू संघात कुणीच नाही. ऑस्ट्रेलियाप्रमाणे हिंदुस्थान संघातही एकमेव विराट कोहली आहे, जो चौथ्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार.

न्यूझीलंड संघात कर्णधार केन विल्यमसन आणि टीम साऊथी हे असे खेळाडू आहेत जे चौथ्यांदा संघाचे प्रतिनिधित्व करतील. मात्र पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकन संघात एकही असा खेळाडू नाही जो आपला चौथा वर्ल्ड कप खेळत आहे. आतापर्यंत सात संघांनी आपले वर्ल्ड कपचे संघ जाहीर केले असून पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या आशियाई संघांनी आपले संघ अद्यापही जाहीर केले नसले तरी बांगलादेशचा अपवाद वगळता दोन्ही संघात एक-दोन वर्ल्ड कप खेळलेले मोजकेच खेळाडू आहेत.

विल्यमसन आणि शाकिब दुसऱयांदा कर्णधार

विल्यमसन दुखापतग्रस्त असला तरी त्याची वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली असून त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्ये तोच न्यूझीलंडचा कर्णधार होता आणि सलग दोन वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व सांभाळणारा तोच एकमेव खेळाडू आहे. तसेच शाकिब अल हसन नुकताच पुन्हा बांगलादेशचा कर्णधार झाला आहे. वर्ल्ड कपमध्येही त्याच्याच हातात बांगलादेशची धुरा सोपविली तर तो दुसऱयांदा वर्ल्ड कपचे नेतृत्व करील. याआधी 2011 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचे कर्णधारपद त्यानेच भूषवले होते. आता तब्बल 12 वर्षांनंतर तो वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा बांगलादेश क्रिकेटचा नेता होईल.

पाच वर्ल्ड कप खेळणारे फक्त सातच

आजवरच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात केवळ सातच खेळाडू पाच वर्ल्ड कप खेळले आहेत. या यादीत हिंदुस्थानचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचे पहिले नाव घेतले जाईल. हे दोन्ही खेळाडू सलग सहा वर्ल्ड कप खेळले आहेत. त्यानंतर श्रीलंकेच्या महेला जयवर्धने, अरविंदा डि’सिल्व्हा, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉण्टिंग, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल यांचा समावेश होतो. हे पाचही फलंदाज सलग पाच वर्ल्ड कप खेळले आहेत. आता या पंक्तीत शाकिब आणि मुशफिकर यांचेही नाव घेतले जाईल.