शरद पवार भाजपाचे बाप आहेत

भारतीय जनता पक्षाने शिवसेना पह्डून दोन गटात भांडणे लावली आणि एसीत बसून तमाशा बघत होते. तशीच खेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पह्डून शरद पवारांसोबत खेळत असतील तर शरद पवार त्यांचे बाप आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केले.

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राष्ट्रवादीतून वेगळा झालेला अजित पवार गट सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. या टीकेला आमदार रोहित पवार यांनी आज सडेतोड उत्तर दिले.

शिवसेनेचे जे केले तसेच राष्ट्रवादीतही व्हावे, असे भाजपचे प्रयत्न आहेत. परंतु शरद पवारांना 60 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. ते राजकीय दृष्टिकोनातून भाजपचे बाप आहेत. त्यांनी भाजपाची ही खेळी जुमानली नाही, असे रोहित पवार म्हणाले. शरद पवारांचे कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष फुटण्यास भाजपा जबाबदार आहे. त्यामुळे भाजपबद्दल काय बोलायचे असा सवालही त्यांनी केला.