‘भावे नाट्यगृहाला तिसरा मजलाच नाही, मग…’, एम. के. मढवी यांच्या वकिलांनी तक्रारदाराच्या खोटेपणाचा बुरखा फाडला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी यांच्या विरोधात कथित खंडणीचा आरोप करणाऱ्या ठेकेदाराच्या खोटेपणाचा बुरखा मढवी यांचे वकील जयदीप ठक्कर यांनी आज न्यायालयात फाडला. विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर पैसे दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे, मात्र भावे नाट्यगृहाला तिसरा मजलाच नाही, असा जोरदार आक्षेप ठक्कर यांनी घेऊन ही कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

एम. के. मढवी आणि त्यांचे वाहनचालक अनिल मोरे यांना शनिवारी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कथित खंडणीप्रकरणी अटक केली. शनिवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार ऐरोलीमध्ये केबलसाठी खोदकाम करणारे ठेकेदार त्रिभुवन लालबिहारी सिंग याने केली आहे.

सिंग याने मढवी यांना अडीच लाख दोन हप्त्यात दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पहिला हप्ता शुक्रवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या तिसऱ्या माळ्यावर दिल्याचे सिंग याने नमूद केले आहे. मात्र भावे नाट्यगृहाला तिसरा माळाच नाही. त्यामुळे सिंगच्या आरोपांबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यानंतरची रक्कम घेताना व्हिडीओमध्ये काहीच दिसत नाही, असा युक्तिवाद अॅड. जयदीप ठक्कर यांनी केला. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सरकारी पक्षाला खोडता आले नाहीत.

सरकारी पक्षाने मढवी यांच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायाधीश ए. आर. शेडगे यांनी मढवी यांना फक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. येत्या मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात आणण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये मढवी यांची बाजू अॅड. जयदीप ठक्कर यांनी मांडली तर शिव विधी सेनेचे सचिव अॅड. ज्ञानेश्वर कवळे, अॅड. मुरलीधर पाटील, राम दयाळकर यांनी त्यांना सहकार्य केले. सरकारची बाजू अॅड. बी. पी. गायकवाड यांनी मांडली.

ठाणे पोलिसांनी का कारवाई केली?

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार नवी मुंबई शहरातील ऐरोलीमध्ये घडला आहे. मग हा गुन्हा कळवा पोलिसांनी कसा काय दाखल करून घेतला. ठाणे पोलिसांनी कारवाई कशी काय केली. हा गुन्हा नवी मुंबईत दाखल होणे आवश्यक होते. ठाणे पोलिसांचे खंडणीविरोधी पथकाने इतकी तत्परता का दाखवली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी मढवी नवी मुंबईमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन येणार होते. त्यामुळे त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी एक दिवस आगोदर ही कारवाई करण्यात आली आहे का, असाही युक्तिवाद यावेळी अॅड. जयदीप ठक्कर यांनी केला.