घाटकोपरमधील 74 वर्षांच्या वृद्धेचे वाचवले प्राण, शिव आरोग्य सेनेने स्वखर्चाने केली रुग्णवाहिका उपलब्ध  

घाटकोपरमधील एका 74 वर्षांच्या वृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांच्या नातेवाईकाने 108 नंबरवर पह्न करून रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले. मात्र, तब्बल एक ते दीड तास टोलवाटोलवी केल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधला असता तातडीने येऊन वृद्धेला स्वखर्चाने राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यामुळे वेळीच उपचार मिळाल्याने वृद्धेचे प्राण वाचले.

 

राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली होती. मात्र ही सेवा आता पुरती ढासळली असून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली पंपनीचे कर्मचारी रुग्णवाहिका पाठवल्याची खोटी माहिती देत टोलवाटोलवी करत आहेत. याचा प्रत्यय घाटकोपरमधील पूर्वेकडील पटेल चौक परिसरात राहणाऱया शोभा रनकोटला यांना आला. त्यांना मधुमेह आहे. त्यातच तिला गँगरीन झाल्यामुळे एक पाय काढण्यात आला. त्यातच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या जावयाने 108 नंबर रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णवाहिका पाठवली आहे सांगत कर्मचाऱयांनी तब्बल दीड तास टोलवाटोलवी केली. शेवटी मुलगा आणि जावयाने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी यांच्याशी संपर्क साधला. प्रकाश वाणी, संघटक सचिन भांगे यांनी वृद्धेला स्वखर्चाने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, 108 सेवा देणारा कर्मचारी खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. याची गंभीर दखल सरकारने घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी यांनी केली आहे