या सरकारला जनता मातीत लोळवल्याशिवाय राहणार नाही; राजन साळवी यांना विश्वास

शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. साळवी यांचे मूळ घर, राहाते घर, हॉटेल, भावाचे घर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. गुरुवारी दुपारी राजन साळवी यांचे बँकेतील लॉकर देखील तपासण्यात आले. त्यानंतर राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण असल्या कारवायांना भीक घालत नाही, अशी कणखर भूमिका घेतली होती. तसेच 2024 हे निवडणूकांचे वर्ष असून यावर्षी राज्यातील जनता या सरकारला मातीत लोळवल्याशिवसाय राहणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.

‘’प्रत्येक आमदाराचं, व्यावसायिकाचं आपलं एक खातं असतं. मी त्यांच्यासोबत बँकेत गेलो, लॉकर उघडलं. त्यांना त्यात काही सापडलं नाही. मला आज टीव्हीवरून कळलं की माझ्याकडे तीन कोटीची संपत्ती असल्याचे सांगत माझ्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या. मी आपल्य माध्यमातून सांगू इच्छितो की 1982 ते 1992 ही दहा वर्ष मी सरकारी नोकरी केली. मला पगार मिळत होता. नोकरी सोडल्यानंतर मी एक झेरॉक्स सेंटर सुरू केलं. 1997 साली रत्नागिरीत माझं हॉटेल परमिट बिअर बार सुरू केला. तो व्यवसाय माझ्या नावावर आहे. आजही माझा तो व्यवसाय सुरू आहे. मध्यंतरी मी आंब्याचा व्यवसाय करत होतो. 2009 सालापासून गेली 14 वर्ष मी आमदार आहे. एवढ्या वर्षात माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा तीन पट संपत्ती असल्याचा आरोप हे करत आहेत हे दुर्देवआहे. माझ्यावरील आरोप चुकीचा आहे. राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, माझ्या मतदारसंघाला, माझ्या जिल्ह्याला, संपूर्ण राज्याला व शिवसेनेला नक्की माहित आहे. आतापर्यंत सहा वेळा चौकशी झाल्या. त्यांच्याकडे जाऊन मी इत्यंभूत माहिती दिली. त्यांना मला आरोपी बनवायचंच आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करायचाच आहे त्यामुळे ते असे आरोप करत आहेत’, असे राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘’आज सकाळी माझ्या घरावर धाड पडल्याचे समजल्यापासून आतापर्यंत शेकडो कार्यकर्ते इथे आले आहेत. याचा अर्थ त्यांचे प्रेम माझ्यावर आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की राजन साळवी काही चुकीचं करूच शकत नाही. मी जे हे घर बांधलं नऊ वर्षापूर्वी त्यावर जनता बँकेचे कर्ज आहे. हॉटेलवर कर्ज आहे. व्यवसाय करणं हे काही चुकीचं नाही. माझ्या जुन्या घरी, राहत्या घरी खोके सापडली असतील, पैशाची बंडलं सापडलं असतील, सोने नाणे सापडले असतील तर मी निश्चितपणे सामोरे जायला तयार आहे, असे राजन साळवी म्हणाले.

या सरकारने ही कारवाई घडवून आणली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ठरवले आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्यांना त्रासच द्यायचा. आपल्यासोबत येत नाही त्यामुळे शिंदे सरकारने ही कारवाई केली आहे. या कारवायांना आम्ही भिक घालत नाही. त्यांना वाटतं या कारवाईने राजन साळवी ढेपाळतील, सरेंडर होतील. पण मला त्यांना सांगायचं आहे की माझ्यावर कारवाई करा, मला अटक करा. चालेल. पण माझ्या पत्नीला व मुलाला या गुन्ह्यात अडकवताय ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे. आम्ही न्यायालयात जाणार, सरकारला जाब विचारणार. लोकप्रतिनिधीच्या पत्नी व मुलावर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असेल, अशी प्रतिक्रीया राजन साळवी यांनी दिली.

‘’ही तर विजयाची नांदी. 2024 हे निवडणूकीचं वर्ष आहे. मार्च मध्ये लोकसभा येतील, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूका येतील, त्यानंतर डिसेंबरमध्ये पालिका निवडणूका येतील. जनता 100 टक्के या सरकारला जागा दाखवतील व मातीत त्यांना मिळवतील’’, असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केला.

‘’धाड पडल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मला दोनदा फोन आले. त्यांनी माझी व कुटुंबीयांची चौकशी केली. मानसिक आधार दिला. संपूर्ण शिवसेना, ठाकरे कुटुंब पाठिशी आहे असं सांगितलं. तसंच राजन घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं असा विश्वासही दिला. शिवसेना खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांनी देखील फोन केले, असे साळवी यांनी सांगितले.