भाजप नेत्याच्या मुलाचा बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. भाजप नेत्याचा मुलगा आणि त्याच्या चार मित्रांनी बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींनी दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका बहिणीवर सामूहिक बलात्कार केला तर दुसऱ्या बहिणीचा विनयभंग करण्यात आला. या घटनेमुळे मध्य प्रदेशात खळबळ माजली असून पोलिसांनी भाजप नेत्याच्या मुलासह काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

यावेळी पीडित मुलींपैकी एकीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला वेळीच वाचवले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

दतियाचे एसपी प्रदीप शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, 17 वर्षांच्या धाकट्या बहिणीच्या वक्तव्याच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दतिया जिल्ह्यातील उन्नाव भागात शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेतील तीन अल्पवयीन आरोपींवर आयपीसीच्या संबंधित कलमांखाली सामूहिक बलात्कार, चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे, विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शर्मा म्हणाले की, चारपैकी तीन आरोपींना चौकशीसाठी आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित मुलीचे म्हणणे नोंदवण्यासाठी तिची प्रकृती सुधारण्याची आम्ही वाट पाहत आहोत.

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन मुलांपैकी एक भाजप नेत्याचा मुलगा असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, दतिया हा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा जिल्हा आहे.