बेशिस्त वाहनांमुळे सोलापुरातील मुख्य चौकांचा श्वास कोंडला

रस्ता तोच अन् तेवढाच, फुटपाथवर हातगाडे, भाजी विक्रेते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षा तसेच लाखांच्या घरातील वाहने यामुळे सोलापुरातील मुख्य चौकांचा श्वासच कोंडला आहे.

सोलापूर शहरातील वाहनांची संख्या आता साडेसहा लाखांवर पोहोचली आहे. त्यात नुसत्या रिक्षाच 16 हजार 700 आहेत. रिक्षांसाठी महापालिका, आरटीओ व शहर पोलिसांच्या माध्यमातून विशिष्ट ठिकाणी थांबे करून दिले जातात. अपघात होणार नाहीत आणि वाहतूककोंडीचा त्रास इतर वाहनचालकांना होणार नाही, हा त्यामागील हेतू असतो. मात्र, नव्याने रिक्षा थांबे झालेच नाहीत. अजूनही दरमहा 15 ते 20 रिक्षा वाढतच आहेत. यासोबत शहरात महिन्याला हजारांच्या घरात वाहने वाढत आहेत.

सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर सर्वात मोठा प्रमुख चौक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक. दररोज या चौकातून लाखो वाहने ये-जा करतात. त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतूककोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. मरणाच्या उंबरठय़ावरील रुग्ण घेऊन अतिवेगाने निघालेल्या रुग्णवाहिकांनासुद्धा त्याठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी त्याठिकाणी वाहतूक पोलिसांची गरज आहे. काहीवेळा तेथे वाहतूक पोलीस असतात पण, कारवाई काहीच होत नाही. वाहनांच्या वर्दळीतून पादचारी वाट काढताना दिसतात, तरीपण बेशिस्तांवर कारवाई का नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज बडे अधिकारी ये-जा करतात. दररोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक-दोन आणि सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत मोठी वर्दळ असते. त्यामुळे नेहमीच त्या वेळेत या चौकात वाहतूककोंडी असते. याठिकाणी डय़ूटी करायला सहसा कोणी तयार होत नसल्याची चर्चा आहे. पण, शहरातील ज्या चौकात सिग्नल आहे, जिथे वाहतूक पोलीस नसतानाही वाहतूक सुरळीत असते, तेथे वाहतूक पोलीस रस्त्यातच वाहनांना अडवून कारवाई करतात. पण, छत्रपती शिवाजी चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस दिसत नाहीत. त्याठिकाणी असलेले एक-दोन वाहतूक पोलीस तेथील झाडाखाली मोबाईलमध्ये व्यस्त असतात, असे चित्र पाहायला मिळते.