ईडी ईडी क्या है? ईडी का मतलब… पंतप्रधान मोदी, भाजपवर निशाणा साधत काँग्रेसने आणले भन्नाट गाणे

ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या आणि  विरोधी पक्षांची राज्य सरकारे पाडणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारवर व भाजपवर काँग्रेस पक्षाने जबरदस्त निशाणा साधला आहे. ‘ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी…’ असे भन्नाट गाणे आणले आहे. लवकरच ‘इंडिया’ आघाडीच्या देशभरात जाहीर सभा सुरू होणार असून त्यात हे गाणे चांगलेच गाजणार हे निश्चित.

‘सौदागर’ चित्रपटातील ‘इलू इलू क्या है? ये इलू इलू… इलू का मतलब…’ हे गाणे हिट झाले होते. काँग्रेस पक्षाने याच धर्तीवर ‘ईडी ईडी क्या है’ हे गाणे तयार केले आहे. छत्तीसगड प्रदेश काँग्रेसने तयार केलेल्या या गाण्याचा व्हिडीओ राहुल गांधी यांनीही ट्विटरवर पोस्ट केला असून लोकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

व्हिडीओत काय आहे

गाण्यात काही लोकांच्या हातात ‘मै ईडी हूं’चा फलक आहे. त्यानंतर हे फलक घेतलेले लोक गरिबांवर कशा धाडी टाकतात, हे दाखविण्यात आले आहे. गाण्यातील शेवटच्या ओळी भन्नाट आहेत. ईडी का मतलब बीजेपी… असे सांगत गरीब लोक धाडी टाकणाऱ्या लोकांना हाकलून लावताना व्हिडीओत दिसत आहेत.