CWC 2023 जगज्जेत्या इंग्लंडचा सूर्यास्त, श्रीलंकेकडूनही लाजीरवाणा पराभव

>> मंगेश वरवडेकर

दमलेल्या सिंहाची चक्क जखमी सिंहाने शिकार केली. म्हणजेच इंग्लंडला दुबळय़ा भासणाऱया श्रीलंकेनेच संपवलं. वर्ल्ड कपचा सूर्य आता कुठे मध्यान्हीला आला होता, पण जगज्जेत्या इंग्लंडचा सूर्य आजच मावळला. वर्ल्ड कपचे चार सामने अजून शिल्लक असले तरी इंग्लंडने आधीच हार मानल्यामुळे त्यांचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे तर श्रीलंकेने आपले आव्हान आणखी एक सामन्यासाठी जिवंत ठेवण्यात यश मिळवले.

इंग्लंडचा संघ 156 धावांत संपला तेव्हाच सामना आणि त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले होते. तरीही त्यांच्या गोलंदाजांकडून अपेक्षा होती, त्यांनीही अपेक्षाभंग केला. डेव्हिड विलीने सुरुवातीलाच दोन धक्के दिल्यामुळे इंग्लंड कमबॅक करील अशी अपेक्षा होती. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ म्हणीप्रमाणे त्यांचे गोलंदाज उताणे पडले आणि पथुम निस्सांका (77) आणि सदिरा समरविक्रमाने (65) यांनी 137 धावांची अभेद्य भागी रचत 26 व्या षटकांतच इंग्लंडच्या मानहानीकारक पराभवावर शिक्कामोर्तब केले. 25 धावांत 3 विकेट घेणारा लाहिरू कुमारा ‘सामनावीर’ ठरला.

इंग्लिश फलंदाजांची पळापळ

मलाननंतर इंग्लंडची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. वर्ल्ड कपपूर्वी सर्वात आक्रमक वाटणाऱया इंग्लंडने अक्षरशः शेपूट घातले. श्रीलंकेच्या सामान्य माऱयापुढेही त्यांचे वन डे स्पेशालिस्ट धडपडू लागले आणि शंभरी लागण्याआधीच इंग्लंडच्या डावाची वाताहत झाली. आधी आधारस्तंभ असलेला ज्यो रूट बाद झाला आणि मग बेअरस्टॉ, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन अशी भलीमोठी रांगच लागली. परिणामतः 85 धावांतच अर्धा संघ गारद झाला.

लाहिरूची कमाल

लाहिरू कुमाराने जोस बटलर (8) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (1) या दोघांना बाद करून इंग्लिश फलंदाजीचे पंबरडेच मोडले होते. तो आज भलताच प्रभावी वाटला. त्याला मॅथ्यूजनेही 2 विकेट टिपून साथ दिली. लाहिरूने स्टोक्सला बाद करून हळूहळू वाढत चाललेल्या इंग्लिश डावालाच रोखले. त्याने 35 धावांत 3 विकेट टिपल्या.

अपेक्षित सलामीनंतर घसरगुंडी

आज नाणेफेकीचं दान इंग्लंडच्या पारडय़ात पडलं, पण त्यांना त्याचा काडीमात्र फायदा झाला नाही, फायदा उठवता आला नाही. सर्वस्व पणाला लावून खेळण्याची वेळ दोघांवर होती, पण खेळली मात्र श्रीलंका. जॉनी बेअरस्टॉ आणि डेव्हिड मलानने अपेक्षित सुरुवात केली. दोघांनी 45 धावांची सलामीही दिली. आज इंग्लंड जोरदार धावा उभारणार अशी चर्चा रंगताच त्यांच्या डावाला नजर लागली. संघात पुनरागमन करणाऱया अँजेलो मॅथ्यूजने डेव्हिड मलानला बाद केले आणि लंकेला पहिले यश मिळवून दिले.

बेनच्या बॅटीतून स्ट्रोक्सच गायब
एकीकडे संघ कोसळत असताना दुसरीकडे बेन स्टोक्स उभा होता. संघाची घसरगुंडी उडाल्यामुळे त्यानेही उचलून खेळणे टाळले, पण या घातक फलंदाजाच्या बॅटीतून स्ट्रोक्सच निघत नव्हते. तो चक्क शंभर मिनिटे उभा राहिला, पण त्याला संघाच्या धावसंख्येत शंभर धावाही जोडता आल्या नाहीत. बॅटीतून फटके निघत नसल्यामुळे पंटाळलेल्या स्टोक्सने अखेर आपली विकेट फेकल्यासारखीच दिली. 73 चेंडूंत 43 धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडचा डाव संपायला फार वेळ लागला नाही. 300-350 धावांची अपेक्षा असलेला संघ 156 धावांतच संपला.